इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही

- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू

जेरूसलेम – ‘इराणने अण्वस्त्रसज्जतेचे प्रयत्न कधीही सोडून दिलेले नाहीत. म्हणूनच इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा देणार्‍या इराणला इस्रायल कधीही अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, हीच माझ्या सरकारची ठाम भूमिका आहे’, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केली. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी अप्रत्यक्ष चर्चा सुरू केली आहे. अशा परिस्थितीत, इस्रायलच्या पंतप्रधानांनी बायडेन प्रशासनाला याद्वारे योग्य तो संदेश दिल्याचे दिसत आहे.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन हे दोन दिवसांच्या इस्रायल दौर्‍यावर होते. ऑस्टिन यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू आणि संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांची भेट घेऊन इस्रायलच्या सुरक्षेसाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या क्षेत्रात अमेरिका आणि इस्रायलसमोर समान आव्हाने आहेत म्हणून आपण इस्रायलच्या दौर्‍यावर आल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री म्हणाले. तर इस्रायल आणि अरब-इस्लामी देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या राजकीय प्रयत्नांना अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा पाठिंबा असल्याचेही संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी इराणपासून असलेल्या धोक्याचा उल्लेख केला नाही, याकडे इस्रायली माध्यमे लक्ष वेधत आहेत. तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायलचे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील, असे ठणकावले. त्याचबरोबर इराणची इस्रायलच्या विरोधातील आक्रमकता आणि दहशतवादी कारवाया यांनाही इस्रायल प्रत्युत्तर देत राहणार असल्याचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी पत्रकारांसमोर जाहीर केले. तर इस्रायलसाठी अमेरिकेसारखा आणि अमेरिकेसाठी इस्रायलसारखा सहकारी देश मिळू शकत नाही, असे पंतप्रधान नेत्यान्याहू म्हणाले. याशिवाय इराणमुळे आखातात शस्त्रस्पर्धा निर्माण होणार नाही, यासाठी आपले प्रयत्न सुरू राहतील, असे इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी स्पष्ट केले.

leave a reply