इराण युक्रेनला योग्य ते प्रत्युत्तर देणार

- इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा

योग्य ते प्रत्युत्तरतेहरान – इराणने युक्रेनविरोधी युद्धासाठी रशियाला ड्रोन्स पुरविले असून त्यांचा वापर रशिया आपल्याविरोधात करीत असल्याचा आरोप युक्रेन करीत आहे. याचा निषेध करण्यासाठी युक्रेनने किव्हमधील इराणच्या राजदूताची हकालपट्टी केली. यामुळे संतापलेल्या इराणने आपल्या राजदूतावर कारवाई करणाऱ्या युक्रेनला लवकरच योग्य ते प्रत्युत्तर देणार असल्याची घोषणा केली आहे.

युक्रेनविरोधी युद्धासाठी रशियाने इराणकडून शस्त्रास्त्रांची खरेदी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. रशियाने इराणकडून मोठ्या प्रमाणात ‘शाहिद-136’ या कामाकाझी अर्थात आत्मघाती ड्रोन्सची खरेदी केली होती. याचा वापर रशियाने ओडेसा प्रांतातील आपल्या लष्कराविरोधात केल्याचा आरोप युक्रेन करीत आहे. त्याचबरोबर रशिया वापरत असलेले इराणचे ‘मोहाजेर-6’ हे टेहळणी ड्रोन देखील आपल्या लष्कराने पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. याशिवाय इराण रशियाला आणखी ड्रोन्स पुरविणार असल्याच्या बातम्याही येत आहेत.

रशिया किंवा इराणने ड्रोन्सच्या या सहकार्याबाबत जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण रशियाला लष्करी सहाय्य पुरविले म्हणून युक्रेनने इराणच्या राजदूतांना तातडीने देश सोडण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर इराणबरोबरच्या राजनैतिक सहकार्यातूनही माघार घेणार असल्याची धमकी युक्रेनने दिली. यामुळे भडकलेल्या इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला. तसेच परदेशी माध्यमांचे ऐकून युक्रेन ही कारवाई करीत असल्याची टीका इराणने केली आहे.

leave a reply