देशात चोवीस तासात कोरोनाचे ५० हजार नवे रुग्ण – रुग्णांची संख्या १३ लाखांच्या पुढे पोहोचली

नवी दिल्ली – देशात तीन दिवसांपेक्षा कमी वेळेत एक लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या १३ लाख ३५ हजारांवर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात ४९ हजार ३१० रुग्णांची नोंद झाली होती. तर शनिवारी रात्रीपर्यंत आणखी सुमारे ५० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. चार राज्यांमध्येच २९ हजार ५०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे चिंता वाढली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.

५० हजार नवे रुग्ण

गेल्या आठवड्याभरापासून राज्यात दरदिवशी सुमारे ४० हजार नवे कोरोना रुग्ण आढळत होते. आता ही संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या चार राज्यातच ६० टक्क्याहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रात २७८ जण दगावले आणि ९,६१५ नवे रुग्ण आढळले. आंध्रप्रदेशात एका दिवसात ४९ जणांचा या साथीचे बळी गेला आणि ८,१४७ नव्या रुग्णांची नोंद झाली. तामिळनाडूत चोवीस तासात ६,७८५ नवे रुग्ण सापडले. तसेच कर्नाटकात ५०३० नव्या रुग्णांची नोंद झाली.

या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुखमंत्र्यांशी २७ जुलैला सवांद साधणार आहेत. पंतप्रधान आणि राज्यांच्या मुखमंत्र्यांमध्ये होणारी ही सातवी संयुक्त बैठक आहे. देशात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचा वेग वाढला असला, तरी रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला आहे, याबाबत दिलासा व्यक्त केला जात आहे. देशात ८ लाख १७ हजार कोरोना रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तसेच साडे चार लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच देशात या साथीच्या बळींची संख्या ३१ हजारांजवळ पोहोचली आहे. मात्र देशातील मृत्यूदर जगात सर्वात कमी आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.

leave a reply