महाराष्ट्रातील काही भागात ‘लॉकडाऊन’ वाढण्याची शक्यता-राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रातील काही भागात ‘लॉकडाऊन’ वाढण्याची शक्यता-राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. ४ (वृत्तसंस्था) –  देशातील २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’ चा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत असला तरी राज्यातील मुंबई आणि इतर शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’मध्ये काही आठवड्यांची वाढ केली जाऊ शकते, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. देशात लागू केलेल्या  ‘लॉकडाऊन’ संपेपर्यंत कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या घटेल अशी अशा आहे. मात्र सध्या तरी या साथीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे  ‘लॉकडाऊन’ चा कालावधी संपत असताना कशी स्थिती असेल यावर पुढील निर्णय अवलंबून राहील, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
शुक्रवारी राज्यात ६७ नवे रुग्ण आढळले होते. गेल्या चार दिवसापासून राज्यात दररोज ७० ते ८० रुग्ण आढळत आहेत. यामुळे केवळ चार दिवसात राज्यातील या साथीच्या रुग्णांची संख्या वाढून दुप्पट झाली असून ५०० च्या जवळ पोहचली आहे. यातील सर्वात जास्त रुग्ण मुंबई व त्या आजूबाजूच्या परिक्षेत्रातील आहेत. शुक्रवारी राज्यात ६ रुग्णही दगावले. यातील चार जण महामुंबई परिक्षेत्रातील आहेत.  यामुळे राज्यातील या साथीत दगावलेल्यांची संख्या २६ झाली आहे. देशात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत आणि सर्वात जास्त मृत्यूही महाराष्ट्रात झाले आहेत.  तसेच धरावीसारख्या आशियातील सर्वात जास्त गजबजलेल्या व दाटीवाटीच्या भागात रुग्ण आढळले आहेत. बुधवारी धारावीत या साथीमुळे दगावलेला रुग्ण हा दिल्लीतील तबलिघी जमातच्या कार्यक्रमातून परतलेल्याच्या संपर्कात आला होता अशी नवी माहिती समोर आली आहे.
याशिवाय मुंबई विमानतळावर तैनात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) ११ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे सर्व महामुंबई परिक्षेत्रात मोडणाऱ्या पनवेल नजीक कळंबोली येथील सीआयएसएफ कर्मचाऱ्यांच्या निवासी इमारतीत वास्त्यव्यास होते. याआधी मुंबई विमानतळावर तैनात एक पोलीस हवालदारही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.  मुंबईखेरीज पुणे, नागपूर, जळगाव, नगरमध्येही कोरोना रुग्ण वाढत आहेत.
या पार्श्वभूमीवर  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  मुंबई आणि राज्यातील इतर काही शहरांमधील ‘लॉकडाऊन’ वाढवला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत. ” देशभरात लागू ‘लॉकडाऊन’ संपेपर्यंत राज्यातील रुग्णांची संख्या घटेल अशी अपेक्षा आहे.  मात्र सध्यातरी रुग्णाची संख्या वाढत आहे. १४ एप्रिल नंतर मुंबई सारख्या शहरातील  ‘लॉकडाऊन’ संपूर्णपणे मागे घेतला जाणार नाही.  ‘लॉकडाऊन’चा हा कालावधी काही आठवडे वाढविला जाऊ शकतो. मात्र त्यावेळी रुग्णांची संख्या व इतर परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाईल”, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी म्हटले आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी  व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा केली होती. यावेळी  ‘लॉकडाऊन’ संपला म्हणजे सर्व संपेल असे होणार नाही. त्यामुळे  ‘लॉकडाऊन’ संपल्यावर नागरिक लगेच रस्त्यावर गर्दी करणार नाहीत याचे नियोजन राज्यांना करावे लागेल. संचार निर्बध टप्प्या टप्प्याने मागे घ्यावे लागतील अशा सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवरही  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या मुंबईसारख्या शहरात  ‘लॉकडाऊन’ वाढण्याच्या वर्तवलेल्या शक्यतेकडे पाहायला हवे.

leave a reply