अफगाणिस्तानात साडे सहा हजार पाकिस्तानी दहशतवादी सक्रीय

काबूल – सध्याच्या घडीला अफगाणिस्तानात साडे सहा हजार पाकिस्तानी दहशतवादी सक्रीय आहेत. यातील हजार दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘लश्कर-ए-तोयबा’चे असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Afganistan Pakistanजैश आणि लश्करचे दहशतवादी अफगाणिस्तानातील तालिबानला सहाय्य करीत असल्याचे या अहवालामुळे स्पष्ट झाले आहे. यामुळे अफगाणिस्तानचे स्थैर्य व शांतता यासाठी आपण मोठे योगदान देत असल्याचा पाकिस्तानचा दावा निकालात निघाला आहे. पाकिस्तानातील जैश आणि लश्कर या दहशतवादी संघटना आपल्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात धाडतात. या दहशतवाद्यांकडून अफगाणिस्तानच्या सुरक्षेला धोका आहे. तालिबानचे हक्कानी नेटवर्क आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनांसोबत जैश व लश्कराचे उत्तम संबंध असल्याचे या अहवालातून बजावण्यात आले आहे. यामुळे अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानचा हात नाही, असे सांगणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश झाला आहे.

अफगाणिस्तानात सक्रिय असलेले हे दहशतवादी अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेले आहे. अफगाणिस्तानाच्या नांगरहार प्रांतात त्यांचे हे नेटवर्क सुरु आहे. यातून तालिबानला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो, ही बाब देखील या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या अहवालानंतर पाकिस्तानला पुन्हा एकदा आपला जैश व लश्कर या दहशतवादी संघटनांशी संबंध नसल्याचे खुलासे द्यावे लागणार आहेत. पण पाकिस्तानचे लष्कर व या देशाची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआय जैश आणि लश्करचे भरणपोषण व संरक्षण करीत असल्याचे अनेकवार उघड झाले होते. त्यामुळे या संर्दभात पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या स्पष्टीकरणावर कोणीही विश्वास ठेवण्यास तयार होणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

leave a reply