भारतीय सीमेतील घुसखोरी चीनच्या विस्तारवादी धोरणांचा भाग

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

India China Border‘वॉशिंग्टन – ‘चीन अजूनही भारतीय सीमेनजीक प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर मोठ्या लष्करी हालचाली करतो आहे. या कारवाया म्हणजे चीनच्या विस्तारवादी धोरणांचा भाग असून त्याचे अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतात ‘, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिला. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीन सीमावाद भयंकर स्वरूप धारण करू शकतो अशी चिंता व्यक्त केली होती. तसेच हा वाद सोडविण्यासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थीचा प्रस्तावही दिला होता. पण भारत आणि चीनने देखील अमेरिकेच्या मध्यस्थीची गरज नसल्याचे जाहीर केले होते. असे असले तरी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे या देशाबरोबर भारताचा सीमावाद सुरू झाल्याचे सांगून चीनवरील दडपण वाढविले आहे.

व्यापारयुद्ध, कोरोनाची साथ आणि हॉंगकॉंग यासारख्या मुद्द्यांवर सध्या अमेरिका व चीन यांच्यातील राजनैतिक संघर्ष शिगेला पोहोचला आहे. चीनच्या नेत्यांकडूनच अमेरिकेबरोबर नवे शीतयुद्ध सुरू असल्याची वक्तव्ये करण्यात येत आहेत. अमेरिकेबरोबर या संघर्षात चीनवर प्रचंड दडपण आल्याचे व त्याला माघार घ्यावी लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. या वास्तवापासून चिनी जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी कम्युनिस्ट राजवटीकडून नवनवीन वाद उकरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारताच्या सीमेनजीक लष्करी हालचालींना आलेला वेग व त्याद्वारे चिथावणी देण्याचे प्रयत्न याचाच भाग आहे.

India Border America‘चीनवर निरंकुश सत्ता गाजविणाऱ्या कम्युनिस्ट पार्टीच्या कारवाया साधी बाब नाही. वर्षानुवर्षे चीनच्या सत्ताधाऱ्यांच्या कारवाया सुरू आहेत. साऊथ चायना सीमधील आक्रमकता याचे ठळक उदाहरण ठरते. चीनच्या वाढत्या व आक्रमक लष्करी क्षमतांमुळे निर्माण झालेल्या धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी अमेरिका भारत व इतर देशांशी भागीदारी करीत आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ म्हणाले. या वक्तव्याद्वारे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या हुकुमशाहीचा विशेष उल्लेख करून पॉम्पिओ यांनी ही राजवट म्हणजे चीनची जनता नाही हे अधोरेखित केले आहे.

याआधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे भारताबरोबरील सीमावाद सुरू झाल्याचा दावा केला होता. तसेच चीनच्या आक्रमकतेमुळे भारताचे पंतप्रधान मोदी संतापले आहेत असे विधान करून ट्रम्प यांनी खळबळ उडवून दिली होती. त्याचवेळी भारत व चीन हे दोघेही लष्करीदृष्ट्या समर्थ देश आहेत, याकडे लक्ष वेधून भारत लष्करीदृष्ट्या चीनइतकाच तुल्यबळ असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच अमेरिकेचा भारताला पूर्ण पाठिंबा आहे असा संदेशही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ सातत्याने देत आहेत.

leave a reply