ब्राझिलमध्ये एका महिन्यात कोरोनाचे ६६ हजारांहून अधिक बळी

- २४ तासांमध्ये ९० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

रिओ दि जानिरो – लॅटिन अमेरिकेतील ब्राझिलमध्ये कोरोनाच्या साथीने हाहाकार उडविला असून एका महिन्यात ६६ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. बुधवारी २४ तासांमध्ये ९० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून ३,८६९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या जगभरात दररोज कोरोनामुळे दगावणार्‍या रुग्णांपैकी २५ टक्के रुग्ण ब्राझिलमधील असल्याचे समोर आले आहे. ही माहिती समोर येत असतानाच ब्राझिलमध्ये कोरोनाव्हायरसचा नवा प्रकार (स्ट्रेन) मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. गेल्या काही महिन्यात विविध देशांमध्ये कोरोनाव्हायरसचे नवे ‘स्ट्रेन’ समोर येत असून त्यामुळे रुग्ण तसेच बळींच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका, आशिया व आफ्रिका या पाचही खंडांमध्ये कोरोनाच्या मूळ व्हायरसऐवजी नवे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळण्यास सुरुवात झाली आहे. ब्राझिलमध्ये कोरोनामुळे उडालेल्या हाहाकारामागेही याच देशात आढळलेला ‘पी१’ हा स्ट्रेन कारणीभूत ठरला आहे.

बुधवारी ब्राझिलमध्ये २४ तासांमध्ये ९० हजार ६३८ रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाची साथ सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनामुळे दगावणार्‍यांची संख्या ३,८६९ असून ही देखील आतापर्यंतची विक्रमी नोंद ठरली आहे. ब्राझिलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या एक कोटी, २७ लाख, ४८ हजार ७४७ झाली असून ३ लाख, २१ हजार, ५१५ जणांचा बळी गेला आहे. मार्च महिन्यात कोरोनामुळे ६६ हजार, ५७३ जणांचा मृत्यू झाला आहे. एका महिन्यात साथ किंवा विशिष्ट घटनेमुळे ब्राझिलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे देशातील वैद्यकतज्ज्ञांनी बजावले आहे.

‘सध्या कोरोनाच्या साथीतील सर्वाधिक वाईट काळ सुरू असल्याचे दिसत आहे. एप्रिल महिना कदाचित याहून वाईट असण्याचे संकेत मिळत आहेत. ब्राझिल सध्या शोकांतिका अनुभवतो आहे’, या शब्दात एस्पिरितो सॅन्टो फेडरल युनिव्हर्सिटीमधील तज्ज्ञ डॉक्टर एथेल मॅसिएल यांनी कोरोनामुळे उडालेल्या हाहाकाराची जाणीव करून दिली. ब्राझिलच्या २७ राज्यांपैकी १८ राज्यांमधील ‘अतिदक्षता विभाग’ ९० टक्क्यांहून अधिक भरले आहेत. साओ पावलो शहरात अतिदक्षता विभागात जागा नसल्याने मार्च महिन्यात २३० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाची तीव्रता कमी होत नसल्याने राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. गेल्या वर्षभरात राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी चारवेळा आरोग्यमंत्री बदलले असून लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला तीव्र विरोध दर्शविला आहे. लॉकडाऊनमुळे बसणारा आर्थिक फटका साथीपेक्षा भयंकर असेल, असा दावा त्यांनी केला आहे. ब्राझिलमधील लसीकरण मोहिमेचा वेगही मंद असून आतापर्यंत फक्त २.३ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात यश मिळाले आहे.

दरम्यान, अमेरिका खंडातील प्रतिनिधित्त्व करणार्‍या ‘पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन’ने, येत्या काही दिवसात गेल्या वर्षीपेक्षा मोठी कोरोनाची लाट येऊ शकते, असा इशारा दिला आहे. लॅटिन अमेरिकेतील ब्राझिल, पेरु, चिली व पॅराग्वेमध्ये बळींची संख्या वाढत असून खंडातील ३२ देशांमध्ये ब्राझिलमधील ‘पी१ स्ट्रेन’चे रुग्ण आढळल्याचे ‘पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन’ने म्हटले आहे.

leave a reply