फ्रान्समध्ये तिसर्‍या लॉकडाऊनची घोषणा

पॅरिस – कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर फ्रान्समध्ये तिसर्‍या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. हा लॉकडाऊन चार आठवड्यांच्या कालावधीसाठी असून शाळा तीन आठवड्यांसाठी पूर्ण बंद राहतील, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिली. जर आता हालचाली केल्या नाहीत, तर आपण नियंत्रण गमावून बसू, या शब्दात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी बुधवारी रात्री लॉकडाऊनची माहिती दिली.

फ्रान्सचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी संसदेला संबोधित करताना, शुक्रवारी मध्यरात्रीपासून राजधानी पॅरिससह १६ राज्यांमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होईल, असे स्पष्ट केले. या काळात सोशल डिस्टंसिंग, वर्क फ्रॉम होम व मास्क यावर भर देण्याची काळजी फ्रेंच जनतेने घ्यावी, असे आवाहनही फ्रेंच पंतप्रधानांनी केले आहे. संध्याकाळी ७ वाजल्यानंतर संचारबंदी लागू असेल, असेही पंतप्रधान कास्टेक्स यांनी सांगितले.

फ्रान्समध्ये गेल्या २४ तासात सुमारे ४० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली असून बळींची एकूण संख्या ९१ हजार, ८३३ झाली आहे. फ्रान्समधील रुग्णांची संख्या ४२ लाख, ४१ हजार, ९५९ वर पोहोचली आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावामागे नवा स्ट्रेन तसेच मंद गतीने सुरू असलेले लसीकरण हे प्रमुख घटक ठरल्याचे सांगण्यात येते.

leave a reply