सिरियातील संघर्षात ८० हून अधिक ठार

- इराकने सिरिया सीमा बंद केली

सीमा बंददमास्कस – ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी सिरियात हसाकेह प्रांतात तुरुंगावर केलेल्या हल्ल्यात आणि त्यानंतर पेटलेल्या संघर्षात ८४ जण ठार झाले. या हल्ल्यामुळे तुरुंगात ठेवलेले आयएसचे दहशतवादी मोठ्या संख्येने फरार झाले असून सिरियामध्ये पुन्हा एकदा आयएसच्या हल्ल्यांची शक्यता वाढली आहे. यानंतर सावध झालेल्या इराकने आपली सीमा बंद केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सिरियाच्या उत्तरेकडील हसाकेह प्रांतात आयएसचे दहशतवादी आणि कुर्द टोळ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. कुर्दांच्या ताब्यात असलेल्या तुरुंगावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न आयएसचे दहशतवादी करीत होते. शनिवारी आयएसच्या दहशतवाद्यांनी यामध्ये यश मिळाले. यावेळी पेटलेल्या संघर्षात आयएसचे ५६ दहशतवादी तर कुर्द टोळ्यांचे २८ सदस्य मारले गेले.

सीमा बंदमोठ्या संख्येने आणि शस्त्रसाठ्यासह आयएसच्या दहशतवाद्यांनी चढविलेल्या या हल्ल्यात हसाकेह प्रांतातील घ्वायरान तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था भेदली गेली. हल्ल्याआधी या तुरुंगात आयएसचे सुमारे ३,५०० दहशतवादी कैद होते. हल्ल्यानंतर आयएसचे शेकडो दहशतवादी या तुरुंगातून पसार झाल्याचा दावा केला जातो.

यापैकी काही दहशतवादी घ्वायरान तुरुंगातील शस्त्रास्त्रे घेऊन पसार झाले. यामध्ये आयएसच्या वरिष्ठ कमांडर्सचा देखील समावेश होता. कुर्द टोळ्यांनी कारवाई करून बहुतांश दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. तरीही आयएसचे बरेच दहशतवादी अजूनही गायब असल्याची माहिती समोर येत आहे.

यानंतर घ्वायरान येथील भयभीत झालेल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी पळ काढण्यास सुरुवात केल्याच्या बातम्या येत आहेत. आयएसचे दहशतवादी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर सिरियामध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१९ साली सिरियातील आयएसचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर येथील दहशतवादी संघटनेच्या कारवाया बर्‍याच प्रमाणात कमी झाल्या होत्या.

सीमा बंदआयएसच्या दहशतवाद्यांनी सिरियन लष्कर, इंधन प्रकल्प तसेच कुर्द टोळ्यांवर हल्ले चढविले होते. पण हसाकेह येथील तुरुंगावर आपल्या साथीदारांना सोडविण्यासाठी इतक्या तीव्रतेचा हल्ला चढविला नव्हता. त्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये आयएसच्या दहशतवाद्यांनी सिरियात चढविलेला हा मोठा हल्ला ठरतो. या पूर्ण घटनेनंतर सिरियातील आयएसच्या हल्ल्यांची शक्यता वाढल्याचा दावा आखाती माध्यमे करीत आहेत. पळ काढत असलेले आयएसचे दहशतवादी आपल्या देशातही घुसतील, याचा धोका ओळखून इराकने सिरियाबरोबरची आपली सीमा बंद केली आहे. असे झाले तर इराकमध्ये देखील आयएसचे हल्ले वाढू शकतात, अशी चिंता इराकला सतावित आहे.

दरम्यान, कुर्द टोळ्या आणि आयएसच्या दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरू असताना, सिरियाच्या वायव्येकडील राक्का प्रांतात अमेरिका व तुर्कीने हवाई हल्ले चढविल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यापैकी अमेरिकेने राक्का येथील नागरी वस्तीवर हवाई कारवाई केल्याचा आरोप सिरियन सरकारने केला. तर तुर्कीने राक्का प्रांतातील कुर्दांच्या नियंत्रणात असलेल्या भागात हल्ले चढविले असून यामध्ये पाच कुर्द बंडखोरांना ठार केल्याचा दावा केला आहे.

leave a reply