पुतिन व क्रिमिआसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यांनंतर जर्मनीचे नौदलप्रमुख के-अचिम शॉनबाच यांचा राजीनामा

के-अचिम शॉनबाचबर्लिन/मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व क्रिमिआसंदर्भात केलेल्या वक्तव्यांनंतर जर्मनीचे नौदलप्रमुख के-अचिम शॉनबाच यांनी राजीनामा दिला आहे. आपण केलेल्या वक्तव्यांमुळे नौदल विभाग व पदावर दडपण येत असून जर्मनी व जर्मन संरक्षणदलांची अधिक हानी होऊ नये म्हणून राजीनाम्याचा निर्णय घेत आहे, अशा शब्दात व्हाईस ऍडमिरल शॉनबाच यांनी राजीनामा सादर केला. जर्मन सरकारने नौदलप्रमुखांचे वक्तव्य ही सरकारची भूमिका नसल्याचा खुलासा केला आहे.

जर्मनीचे नौदलप्रमुख के-अचिम शॉनबाच गेल्या आठवड्यात भारत दौर्‍यावर होते. यावेळी ‘मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडिज् ऍण्ड ऍनालिसिस’ या अभ्यासगटाच्या कार्यक्रमात त्यांनी रशिया व चीनसंदर्भातील आपली भूमिका मांडली. ‘रशियाला फक्त युक्रेनमधील छोटासा भाग हवा आहे का? नाही! रशियाला युक्रेन आपल्यात सामील करून घ्यायचा आहे का? नाही! हा सगळा मूर्खपणा आहे. पुतिन दबाव टाकत आहेत कारण ते तसा के-अचिम शॉनबाचटाकू शकतात आणि दबाव टाकल्यावर युरोपिय महासंघात फूट पडू शकते, याची त्यांना कल्पना आहे. पुतिन यांना आदर हवा आहे. कोणतीही किंमत न मोजता जर पुतिन यांना मान देणे शक्य आहे, तर तो त्यांना द्यायला हवा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष त्यासाठी पात्र आहेत, असे आपल्याला वाटते’, असे वक्तव्य जर्मन नौदलप्रमुखांनी केले.

युक्रेनच्या मुद्यावर रशियाच्या हालचालींची दखल घेणे आवश्यक असल्याकडेे नौदलप्रमुख शॉनबाच यांनी लक्ष वेधले. मात्र त्याचवेळी युक्रेनने क्रिमिआ कायमचा गमावला आहे, तो आता त्यांना माघारी मिळणे शक्य नाही आणि हे वास्तव स्वीकारणे भाग असल्याचा दावाही केला. रशियाने २०१४ साली क्रिमिआवर ताबा मिळविला होता. रशियाच्या या ताब्याला आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता दिलेली नाही. असे असतानाही जर्मन नौदलप्रमुखांनी क्रिमिआबाबत केलेले हे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरले. नौदलप्रमुख शॉनबाच यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व क्रिमिआसंदर्भात केलेली वक्तव्ये जर्मन सरकार व संरक्षणविभागाने फेटाळून लावली आहेत.

के-अचिम शॉनबाचजर्मनीसह युक्रेन तसेच इतर देशांकडून या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शॉनबाच यांची वक्तव्ये युक्रेन मुद्यावर पाश्‍चात्य देशांकडून सुरू असणार्‍या प्रयत्नांना धक्का देणारी ठरतात, अशी टीका युक्रेनने केली आहे. आपल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या गदारोळानंतर नौदलप्रमुख के-अचिम शॉनबाच यांनी जर्मनीच्या संरक्षणमंत्री ख्रिस्तिन लॅम्ब्रेक्ट यांच्याकडे राजीनामा सोपविला असून राजीनामा मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्‍वभूमीवर युक्रेन सरकारला शस्त्रपुरवठा करण्यास जर्मन सरकारने नकार दिल्याचे समोर आले आहे. ‘लेथल वेपन्स’ची निर्यात न करण्याचे जर्मनीचे धोरण असून त्या अनुषंगाने युक्रेनला शस्त्रपुरवठा न करण्याचा निर्णय घेतल्याचे जर्मनीकडून सांगण्यात आले. जर्मनीने बाल्टिक देशांमधील इस्टोनियालाही जर्मन बनावटीची शस्त्रास्त्रे व यंत्रणा युक्रेनला पुरवू नयेत, असे निर्देश दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. जर्मनीच्या या निर्णयावर युक्रेनच्या सरकारने नाराजी व्यक्त करून हा निर्णय पुतिन यांना बळ देणारा असल्याची टीका केली आहे.

leave a reply