अफगाणींसाठी भारताच्या सहाय्याचा मार्ग खुला करण्याची पाकिस्तानची तयारी

नवी दिल्ली – अडवणूक करून व आढेवेढे घेऊन भारताकडून अफगाणिस्तानला पुरवला जाणारा ५० हजार मेट्रिक टन गव्हाचा मार्ग रोखणारा पाकिस्तान, आता यासाठी सहकार्य करायला तयार झाला आहे. यामुळे अटारी-वाघा सीमेवरून भारत हा गहू अफगाणी जनतेपर्यंत पोहोचवू शकेल. यावर दोन्ही देशांची सहमती झाल्याचा दावा केला जातो. दरम्यान, पाकिस्तानने हे सहाय्य रोखलेले असताना, भारताने तीन वेळा अफगाणी जनतेसाठी हवाई मार्गाने वैद्यकीय सहाय्य पुरविले होते. तसेच इराणच्या छबहार बंदारामार्फत गहू पोहोचविण्याची तयारीही भारताने केली होती.

अफगाणींसाठी भारताच्या सहाय्याचा मार्ग खुला करण्याची पाकिस्तानची तयारीतालिबानच्या राजवटीला अजूनही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे अफगाणी जनतेला सहाय्य पुरविणे सर्वच देशांसाठी अवघड बनले आहे. यामुळे अफगाणींची उपासमार होत असून हिवाळ्यात लाखो अफगाणींचा यामुळे बळी जाऊ शकतो, असे संयुक्त राष्ट्रसंघाने बजावले होते. पाकिस्तानने देखील अफगाणी जनतेला सहाय्य करण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला केले खरे. पण प्रत्यक्षात भारताने अफगाणिस्तानसाठी घोषणा केलेल्या सुमारे ५० हजार मेट्रिक टन इतक्या गव्हाचा पुरवठा रोखण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला होता.

या गव्हाच्या वाहतुकीसाठी भारताला मार्ग न देता अडवणूक करण्याचे धोरण पाकिस्तानने स्वीकारले होते. अफगाणी जनतेपर्यंत भारताचे हे सहाय्य पोहोचले तर भारताचा अफगाणिस्तानातील प्रभाव अधिकच वाढेल, अशी भीती पाकिस्तानला वाटत होती. मात्र यासंदर्भात तालिबानने टाकलेल्या दडपणामुळे पाकिस्तानला भारताचा प्रस्ताव मान्य करावा लागला. तरीही पाकिस्तानने यासाठी भारतासमोर शर्ती ठेवल्या होत्या.

पण भारताकडून पुरविला जाणारा हा गहू आपल्या छाबहार बंदरामार्फत अफगाणींपर्यंत पोहोचविण्याची तयारी इराणने दाखविली. त्यानंतर मात्र पाकिस्तानला भारताचा प्रस्ताव मान्य करावा लागल्याचे दिसत आहे. पाकिस्तानातील काही पत्रकारांनीच आपल्या देशाच्या धोरणांवर टीका केली होती. अफगाणींसाठी सहाय्याचे आवाहन करणारा पाकिस्तान भारत करीत असलेले सहाय्य रोखून आपल्यालाच खोटे पाडत आहे, हे या पत्रकारांनी लक्षात आणून दिले होते.

या पार्श्‍वभूमीवर, दोन दिवसांपूर्वी, यासंदर्भातील भारताच्या प्रस्तावाची आम्ही वाट पाहत आहोत, असे पाकिस्तानने जाहीर केले होते.

leave a reply