८० टक्के रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत नाहीत

- आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली – जवळपास ८० टक्के कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतेही लक्षण आढळून येत नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असतानाच रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाव्हायरसच्या रूग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. कोविड-१९ च्या लक्षणांच्या अभावासंबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) कोरोनाबाधित ८० टक्के रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नसल्याची किंवा  अगदी सौम्य लक्षणे  आढळून येत असल्याचे समोर येत आहे. जगभरात झालेल्या विश्लेषणावरून हे लक्षात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या साथीची  लागण झालेल्या रुग्णांना ताप, सर्दी, खोकला किंवा श्वसनाचा त्रास जाणवतो. परंतु, अनेक रुग्णांना यापैंकी कोणताही त्रास होत नसल्याचे समोर आले आहे. तरीदेखील त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येते. अशा व्यक्ती संक्रमणाचं एक माध्यम बनू शकतात. त्यामुळे नागरिकांनी घरातही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची आवश्यकता आहे. यासह घरातून बाहेर पडताना मास्क वापरूनच बाहेर पडण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला.

पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या १०० पैकी ८० रूग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसून आली नसून ही चिंताजनक बाब आहे. यामुळे  करोनाची लागण झालेल्यांचा शोध घेऊन उपचार करणे कठीण जाते.संशयीत लक्षात येत नाहीत. त्यामुळे करोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या आणि परिसरातील सर्वांची करोना चाचणी करण्यात येत आहे. तसेच परदेश दौऱ्याहून आलेल्या किंवा करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या संशयितांची टेस्ट घेतली जात आहे.  तसेच  ज्या रुग्णांमध्ये करोनाची लक्षणं आढळतात अशा सर्वांचीच टेस्ट केली जात आहे. अशा पद्धतीनं तपासणी केली नाही, तर भारताची परिस्थिती अवघड होईल, असे “आयसीएमआर’च्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले. रुग्णालयात दाखल करण्यात येत असलेल्या गंभीर रुग्णांची पाच दिवसातून एक वेळा चाचणी करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

leave a reply