हजार बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधून भारतात येण्याच्या तयारीत

नवी दिल्ली – चीनमधून आपले कारखाने हलविण्याचा तयारीत असलेल्या सुमारे हजार बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आपले कारखाने स्थापण्यास उत्सुक आहेत. यामुळे पुढच्या काळात भारत जागतिक उत्पादनाचे केंद्र बानू शकतो. या कंपन्या विविध सरकारी विभाग, परदेशातील भारतीय दूतावासांमार्फत विविध पातळ्यांवर भारताशी चर्चा करीत असल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली. याशिवाय दक्षिण कोरियातील भारतातील राजदूत श्रीप्रिया रंगनाथन यांनीही येत्या काही महिन्यात कोरियन कंपन्या आपले कारखाने भारतात हलवतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

कोरोनाव्हायरस बद्दल बरेच काही दडवून ठेवल्याचे आरोप चीनवर होत आहेत. कोरोनाव्हायरसच्या साथीला जबाबदार असलेल्या चीनच्या विरोधात आंतराष्ट्रीय पातळीवर वातावरण तापले आहे. याचा परिणाम जगातील प्रमुख देशांच्या चीनबरोबरील व्यापारी संबंधांवर होण्याची दाट शक्यता समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी कंपन्यांना चीनमधून गाशा गुंडाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे अमेरिका आणि चीन संबंध अधिकच बिघडले असून पुढील काळात अमेरिकी कंपन्या चीन बाहेर पडू शकतात असे दावे करण्यात येत आहे.

अमेरिकेबरॊबर जपान, दक्षिण कोरिया या देशांनाही चीनबरोबरील व्यापारी सहकार्य कमी करण्याची तयारी सुरु केली आहे. दोन आठवड्यांपूर्वीच जपानने चीनमधून बाहेर पडण्यास इच्छुक असलेल्या जपानी कंपन्यांना २.२ अब्ज डॉलर्सचे साहाय्य पुरविले जाईल अशी घोषणा केली होती. जपानच्या सरकारने आपल्या कंपन्यांना चीनमधून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन देऊन चीनला फार मोठा धक्का दिला आहे. पुढील काळात इतर देशही असेच निर्णय घेतील असा दावा करण्यात येतो. ही भारतासाठी सुसंधी असून याचा लाभ भारताला मिळू शकतो असेही विश्लेषकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर १००० कंपन्या आपले कारखाने भारतात स्थापन करण्यासाठी भारत सरकारबरोबर चर्चा करीत असल्याची बातमी समोर आली आहे. या कंपन्यांपैकी सुमारे ३०० कंपन्यांनी आपल्या योजना मांडल्या असून त्यांच्याबरोबर विचारविनमय सुरु आहे अशी माहिती, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. या ३०० कंपन्या इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, वैद्यकीय उपकरणे, वस्त्रउद्योग क्षेत्राशी निगडित असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली.

‘कोरोनाव्हायरसचे संकट नियंत्रणात आल्यावर भारतासाठी खूप चांगल्या गोष्टी घडतील अशी अपेक्षा आहे. भारत पर्यायी जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येईल. सप्टेंबर महिन्यात भारत सरकारने कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी कपात केली होती. हा कर २५.१७ टक्क्यांपर्यंत खाली आणला होता, तर नव्या उत्पादन कंपन्यांसाठी हा कर १७ टक्के इतका करण्यात आला आहे. हा कर इतर दक्षिण व पूर्व आशियायी देशांपेक्षा खूप कमी आहे. याचा लाभ भारताला मिळेल’,असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

‘एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवण्याच्या आपल्या धोरणाचा जग आता फेरविचार करीत आहे. कित्येक कंपन्यांनी भारतात येण्यास उत्सुकता आहेत ‘, असे ‘डिपार्टमेन्ट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड’चे (डीपीआयआयटी) सचिव गुरुप्रसाद मोहपात्रा यांनी म्हटले आहे.

दरम्यान दक्षिण कोरियातील भारताच्या राजदूत श्रीप्रिया रंगनाथन यांनी कोरोनाचे संकट सरल्यानंतर कोरियन कंपन्या भारतात आपले कारखाने स्थापन करतील असे स्पष्ट संकेत दिले आहेत. भारतातील बाजारपेठातील प्रचंड मागणी बघता पुढील काही महिन्यांनी कोरियन कंपन्या यावर अंमलबाजवणी करतील असा विश्वास एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजदूत रंगनाथन यांनी व्यक्त केला.

leave a reply