सदोष निदानामुळे चिनी ‘रॅपिड टेस्टिंग किट्स’चा वापर थांबण्याच्या राज्यांना ‘आयसीएमआर’च्या सूचना

नवी दिल्ली – काही राज्यांमध्ये रॅपिड टेस्टिंग किट चुकीचे निदान करीत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर या किट्सचा वापर थांबवण्यात यावा अशा सूचना इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) राज्यांना दिल्या आहेत. पुढील दोन दिवसात या संदर्भात नव्याने निर्देश जारी करण्यात येतील, अशी माहिती ‘आयसीएमआर’च्या साथ व संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. गेल्याच आठवड्यात चीनमधून आयात करण्यात आलेले पाच लाख रॅपिड टेस्टिंग किट्स मिळाले होते, तर लवकरच सहा लाख किट्स आणखी मिळणार आहेत. मात्र या चिनी रॅपिड टेस्टिंग किट्सचा वापर करून राज्यांमध्ये सुरु करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग मोहिमेत अडथळा आला आहे.

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता ५ लाख रॅपिड टेस्टिंग किट्स खरेदी करण्यात आल्या होत्या व त्या राज्यांना पुरविण्यात आल्या आहेत. हे टेस्टिंग किट्स भारताने चीनमधून आयात केल्या आहेत. या रॅपिड टेस्टिंग किट्स ९० टक्के अचूक निदान करणे अपेक्षित आहे. परंतु या किट्स फक्त ५.४ टक्केच अचूक निदान देत आहेत. एका राज्याकडून रॅपिड टेस्टिंग किट बाबत तक्रार करण्यात आली. त्यानंतर या किट संदर्भात आणखी तीन राज्यांकडून माहिती घेतली असता पॉझिटिव्ह असलेल्या नमुन्यांमध्ये मोठी तफावत दिसून आल्याने रॅपिड टेस्टिंग किटचा वापरणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणीची चौकशी करण्यात येणार असून आयसीएमआरच्या ८ केंद्रांमध्ये हे किट्स तपासणीसाठी पाठववण्यात येणार आहेत. या ठिकाणी किट्स पडताळणी केली जाईल. ते योग्य प्रकारे काम करत आहेत की नाही हे बघितले जाईल. तपासणीत रॅपिड टेस्टिंग किट्सच्या काही बॅचेस सदोष आढळून आल्या, तर त्या संबंधित कंपनीकडून बदलून घेतल्या जातील. दोन दिवसांत आमच्या तपासणी जे काही आढळून येईल याची माहिती दिली जाईल आणि नव्याने निर्देश दिले जातील, असं डॉ. रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले.

चीनमधून आयात करण्यात आलेल्या या किट्सबाबत सुरवातीपासून शंका उपस्थित करण्यात येत होती. चीनकडून किट्स आयात करणाऱ्या इतर देशांनीही अशाच तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे भारताने चीनमधून टेस्टिंग किट्स आयात करु नये असा सूर देखील ऐकू येत होता. मात्र कोरोनाचा वाढता फैलाव पाहता किट्सची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे चीनमधून हे टेस्टिंग किट्स आयात करण्यात आले होते.

leave a reply