‘आयएनएस प्रबल’वरुन विनाशिकाभेदी क्षेपणास्त्राने घेतला लक्ष्याचा अचूक वेध

- व्हिडीओ प्रसिद्ध करून नौदलाचा शत्रूंना संदेश

नवी दिल्ली – अरबी समुद्रात सुरु असलेल्या युद्धसरावादरम्यान भारतीय नौदलाने ‘आयएनएस प्रबल’ या विनाशिकेवरून जहाजभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. ‘आयएनएस प्रबल’वरून सोडण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने लक्ष्य असलेल्या गोदावरी श्रेणीतील नौदलाच्या जुन्या निवृत्त युद्धनौकेचा अचूक वेध घेतला. हा निशाणा इतका सटीक होता की या जहाजाला जागच्या जागी जलसमाधी मिळाली. नौदलाने या चाचणीचा व्हिडीओ प्रसिद्ध करून चीन आणि पाकिस्तानला संदेश दिल्याचे दावे विश्लेषक करीत आहेत.

'आयएनएस प्रबल'

‘आयएनएस प्रबल’ ही वीर श्रेणीतील भारतीय नौदलाची क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अशी आधुनिक विनाशिका आहे. मुंबईच्या ‘माझगाव डॉकयार्ड’मध्ये ही विनाशिकेची बांधणी करण्यात आली होती आणि २००२ साली ही विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली होती. या विनाशिकेवर रशियन बनावटीची ‘केएच-३५ उरण’ जहाजभेदी क्षेपणास्त्राने सज्ज आहेत. हे क्षेपणास्त्र १३० किमी दूरवरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते.

चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने हिंदी महासागरातील तैनाती वाढविली असून नौदलाकडून नियमित युद्धसराव केले जात आहेत. अरबी समुद्रात सुरु असलेल्या अशाच एका सरावादरम्यान ‘आयएनएस प्रबल’वरून जहाजभेदी क्षेपणास्त्र डागण्यात आले. आणि त्याने ठरविलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. यावेळी स्वदेशी बनावटीच्या गोदावरी श्रेणीतील ‘ आयएनएस गंगा’ या जुन्या निवृत्त यद्धनौकेची लक्ष्य म्हणून तैनाती करण्यात आली होती. ही युद्धनौका ३५ वर्षांच्या सेवेनंतर २०१८ मध्ये नौदलातून निवृत्त झाली होती. या सरावाचा व्हिडिओ नौदलाने प्रसिद्ध केला असून यात क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य साधल्याचे दिसत आहे.

गेल्या काही आठवड्यांमध्ये भारताने १४ क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या. यामुळे संरक्षणदलाचे सामर्थ्य वाढले आहे. दोन दिवसांपूर्वीच अरबी समुद्रात ‘आयएनएस चेन्नई’ या विनाशिकेवरुन सुपरसोनिक ‘ब्रह्मोस’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. भारताचा चीन आणि पाकिस्तानसोबतचा तणाव वाढलेला असताना क्षेपणास्त्रांच्या या चाचण्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या ठरतात. तसेच चीन आणि पाकिस्तानला यातून संदेश देण्यात येत असल्याचे दावे केले जात आहेत.

leave a reply