अरबी समुद्रात भारतीय नौदलप्रमुखांकडून युद्धसज्जतेचा आढावा

कारवार – ‘गेल्या काही महिन्यांपासून भारतीय नौदलाने कोणत्याही आकस्मिक परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण सज्जता ठेवली आहे. येत्या काळातही नौदलाच्या युद्धनौका, पाणबुड्या, विमानांची पथके सागरी आव्हानांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत’, अशी घोषणा नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी केली. अरबी समुद्रात आयोजित केलेल्या नौदलाच्या युद्धसरावाची पाहणी केल्यानंतर नौदलप्रमुखांनी हा दावा केला. गेल्या महिन्याभरात भारतीय नौदलाचा हा चौथा युद्धसराव असून या मालिकेतला अरबी समुद्रातील हा पहिला युद्धसराव ठरतो. तर पुढच्या महिन्यात भारतासह अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या ‘क्वाड’ सदस्य देशांच्या नौदलाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा युद्धसराव होणार आहे.

युद्धसज्जतेचा आढावा

भारतीय नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी गेल्या चोवीस तासात अरबी समुद्रातील नौदल तळ आणि युद्धनौकांना भेटी देऊन युद्धसज्जतेची पाहणी केली. यावेळी नौदलप्रमुखांनी कारवार येथील नौदलाच्या वेस्टर्न कमांडच्या तळावरील अधिकार्‍यांशी चर्चा करून युद्ध सज्जतेबरोबर सायबर सुरक्षा, दहशतवादी हल्ले, अपारंपरिक युद्धतंत्रासाठी सर्वकाळ सज्ज राहण्याची सूचना केली. यानंतर नौदलप्रमुखांनी अरबी समुद्रात आपल्या विनाशिकांच्या ताफ्यासह युद्धसराव करणारी विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रमादित्य’ आणि ‘आयएनएस चेन्नई’ या विनाशिकेलाही भेट दिली. अरबी समुद्रात भारतीय नौदलाने आयोजित केलेला हा सर्वात मोठा युद्धसराव मानला जातो.

नौदलप्रमुखांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या युद्धसरावात विमानवाहू युद्धनौका, विनाशिकेबरोबर संरक्षक जहाजे तसेच इंधनवाहू जहाजे, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स यांनी सहभाग घेतला होता. यात लाईव्ह फायरिंग ड्रिल, पाणबुडीविरोधी युद्धसराव, विनाशिकांच्या कसरती आणि हवाई सुरक्षा यंत्रणेची चाचणी व हवाई युद्धाचा सराव करण्यात आला. या युद्धसरावात भारतीय नौदलाने काही क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करून अचूक लक्ष्य साधले. कोरोनाव्हायरसच्या संकटात भारतीय नौदलाने केलेल्या कामगिरीचे नौदलप्रमुख करमबीर सिंग यांनी कौतूक केले. या कठीण काळातही भारतीय नौदलाने आपल्या युद्धसज्जतेत ढिलाई दाखविली नाही व यापुढेही भारतीय नौदल येणार्‍या आव्हानांसाठी अधिक तयारीने सज्ज असेल, असा विश्वास अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी व्यक्त केला. तर गेल्या काही महिन्यांमध्ये तीनही सैन्यदलाच्या समन्वयाने अनेक गोष्टी साध्य झाल्याचेही नौदलप्रमुखांनी अधोरेखित केले.

युद्धसज्जतेचा आढावा

अरबी समुद्रात आयोजित केलेला हा युद्धसराव आणि नौदलप्रमुखांची या युद्धसरावातील उपस्थिती निराळे संकेत देणारी असल्याचा दावा केला जातो. पाकिस्तानने कराची बंदरात चीनच्या पाणबुड्यांच्या तैनातीसाठी स्वतंत्र हालचाली सुरू केल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. लवकरच चीनच्या पाणबुड्या कराची बंदरात दाखल होतील, असेही बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर, अरबी समुद्रात युद्धसरावाचे व त्यातही पाणबुडीभेदी विनाशिकांचा सराव आणि विनाशिकाभेदी क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन भारताने आपले शक्तीप्रदर्शन केले आहे. पुढच्या महिन्यात बंगालच्या उपसागरात होणार्‍या ‘मलाबार २०२०’ युद्धसरावात देखील ‘क्वाड’ सदस्य देशांच्या पहिल्या नौदलसरावात मोठे शक्तीप्रदर्शन अपेक्षित आहे. या युद्धसरावात भारत, जपान आपली एक तर अमेरिका दोन विमानवाहू युद्धनौका उतरविणार असल्याचा दावा केला जातो.

युद्धसज्जतेचा आढावा

लडाखच्या सीमेवर चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने अरबी समुद्रापासून हिंदी महासागर ते बंगालच्या उपसागर क्षेत्रातील आपली तैनाती व सज्जता वाढविली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय नौदलातील पाणबुड्या, विनाशिका आणि जलदगतीच्या गस्तीनौकांचा प्रवेश वाढला असून ‘विक्रांत’ या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेची चाचणीही सुरू झाली आहे. या काळात ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ अर्थात ‘डीआरडीओ’ने ब्रह्मोस या सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या मारक क्षमतेत वाढ करुन भारतीय नौदलाला अधिकच सक्षम बनविले आहे. तर पाणबुडीविरोधी आणि युद्धनौकाभेदी युद्धासाठी आवश्यक क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन भारताने आपली युद्धसज्जता दाखविल्याचा दावा लष्करी विश्लेषक करीत आहेत.

leave a reply