‘ब्लॅक डे’चे प्रयत्न उधळून लावण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडून सिंधमध्ये कारवाई

इस्लामाबाद – ‘ मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट’ने (एमक्यूएम) पाकिस्तानचा स्वतंत्र दिन ‘ब्लॅक डे’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केल्यावर पाकिस्तान लष्कराने ‘एमक्यूएम’सह सिंध मधील इतर पक्षांच्या नेत्यांवर कारवाई सुरु केली आहे. ‘ब्लॅक डे’ साजरा करण्याचा हा प्रयत्न उधळण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने धरपकड करीत असून स्थानिकांना धमकावत आहे, अशा बातम्या आहेत.

'ब्लॅक डे'

गुरुवारी पाकिस्तानच्या सिंधमध्ये २० हून अधिक वाहनांचा ताफा घेऊन पाकिस्तानी रेंजर्स आणि ‘आयएसआय’च्या अधिकांऱ्यानी ‘जे सिंध मुत्ताहिदा महाज'(जेएसएमएम)चे उपाध्यक्ष लाला अस्लम पठाण यांच्या घरी धाड टाकली. पठाण यांचे अपहरण करण्याच्या हेतूने पाकिस्तानी लष्कराचे जवान येथे धडकले होते, असा दावा केला जातो. पण पठाण घरी नसल्यामुळे त्यांचा हा कट उधळला गेला. पण यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांच्या कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना धमकावले. तसेच त्यांच्या मुलाला अटक करण्याची धमकी दिली, असा आरोप होत आहे.

१४ ऑगस्ट रोजी सिंधी ‘ब्लॅक डे’ सोबत ‘ गुलामी दिन’ साजरा करणार आहे. तो यशस्वी होऊ नये म्हणून पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा सिंध नेत्यांना धमकावत असल्याचे ‘जेएसएमएम’ने म्हटले. दरम्यान, सोशल मीडियावर ‘#१४ऑगस्टब्लॅकडे’ या हॅशटॅग अंतर्गत ट्रेंड सुरु झाला आहे. ‘ हम नही मानते इस नाम निहाद आझादी को’ अशा घोषणा दिल्या जात आहेत.

अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमधल्या पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर सिंधी पाकिस्तानविरोधात निदर्शने करणार आहे. तसेच ‘ मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट’ (एमक्यूएम) पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस ‘ब्लॅक डे’ म्हणून साजरा करणार आहे. पाकिस्तानी लष्कराकडून सिंधी जनतेवर केल्या जात असलेल्या अत्याचाराविरोधात निदर्शने करणार असल्याचा इशारा ‘एमक्यूएम’चे प्रमुख अल्ताफ हुसेन यांनी दिला होता.

leave a reply