देशातील पहिल्या खाजगी रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली – भारताच्या ‘स्कायरूट एअरोस्पेस’ या खाजगी कंपनीने ‘अपर स्टेट रॉकेट’ इंजिनची यशस्वी चाचणी घेतली. देशात खाजगी कंपनीने विकसित केलेले हे पहिले रॉकेट इंजिन ठरते. या इंजिनचे नाव नोबल पुरस्कार विजेते भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही रामण यांच्या नावाने ‘रामन’ असे ठेवण्यात आले आहे. नुकतेच देशातील अंतराळ क्षेत्र हे खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खाजगी कंपन्यांना रॉकेट प्रक्षेपक बनविण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसातच आलेली बातमी लक्षवेधी ठरते.

रॉकेट इंजिन

दोन वर्षांपूर्वी इस्रोचे माजी वैज्ञानिक पवन कुमार चंदना आणि नाग डाका यांनी ‘स्कायरूट एअरोस्पेस’नावाची स्टार्टअप कंपनी सुरु केली. ‘स्कायरूट एअरोस्पेस’ कडून देशातील पहिले खाजगी रॉकेट प्रक्षेपक विकसित केले जात आहे. यासाठी या कंपनीच्या संशोधकांनी ‘रामन’ हे थ्रीडी रॉकेट इंजिन विकसित केले. ‘स्कायरूट एअरोस्पेस’कडून तयार करण्यात येत असलेल्या रॉकेट प्रक्षेपकामध्ये २५० ते ७५० किलो वजनाचे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठविण्याची क्षमता असेल. त्यादृष्टीने हे इंजिन विकसित करण्यात आल्याच्या दावा पवन कुमार चंदना यांनी केला.

२०२१ सालच्या डिसेंबर महिन्यात हे रॉकेट अवकाशात झेपावेल, असे ते म्हणाले. ‘स्कायरूट’कडून विकसित करण्यात येत असलेल्या रॉकेटचे वजन पारंपरिक रॉकेटच्या वजनापेक्षा हलके असल्याचे पवन कुमार यांनी संगितले. तसेच स्कायरूट एअरोस्पेस कंपनी आणखी दोन रॉकेट इंजिन विकसित करणार आहे. येत्या सहा महिन्यात त्याच्या चाचण्या होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, जून महिन्यात केंद्र सरकारने भारतीय अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले केले. यानुसार खाजगी कंपन्या रॉकेट आणि उपग्रह विकसित करु शकतील. याचे इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी स्वागत केले होते. यामुळे जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारत महत्त्वाचे स्थान पटकावेल, असा विश्वास सिवन यांनी व्यक्त केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी श्रीहरिकोटा इथे खाजगी क्षेत्राला स्वतः चे लाँचपॅड उभारण्यास परवानगी दिली होती. जगात विकसित देशांमध्ये अंतराळ क्षेत्रात खाजगी कंपन्या वर्चस्व गाजवत असताना भारतात स्कायरूटचे हे यश महत्त्वाचे ठरते.

leave a reply