रेअर अर्थ मिनरल्स’मधील चीनच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी रशियाच्या हालचाली

मॉस्को – संरक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्पादनांसाठी महत्त्वाचा घटक असणाऱ्या ‘रेअर अर्थ मिनरल्स’मधील चीनच्या प्रभावाला धक्का देण्यासाठी रशियाने हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या काही महिन्यात रशिया या क्षेत्रात जवळपास दीड अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल, अशी माहिती रशियाचे उद्योग व व्यापार उपमंत्री अलेक्सी बेसप्रोझ्वेनिख यांनी दिली. चीनकडे ‘रेअर अर्थ मिनरल्स’चे ३५ टक्क्यांहून अधिक साठे असून गेल्या वर्षी झालेल्या जागतिक उत्पादनात ८० टक्‍क्‍यांहून अधिक वाटा एकट्या चीनचा होता. रशियाकडे १० टक्के साठे असल्याचे सांगण्यात येत असले, तरी जागतिक उत्पादनातील त्याचा वाटा फक्त दीड टक्के आहे. या पार्श्वभूमीवर, रशियाकडून देण्यात आलेले गुंतवणुकीचे संकेत महत्त्वाचे ठरतात.

रेअर अर्थ मिनरल्स

लढाऊ विमाने व क्षेपणास्त्रांसह स्मार्टफोन, संगणक तसेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी वापरण्यात येणार्‍या ‘रेअर अर्थ मिनरल्स’मध्ये जगातील निवडक १७ खनिजांचा समावेश होतो. त्यात ‘निओडायनिम’, ‘सेरियम’, ‘समारियम’, ‘निओबियम’, ‘लॅन्थेनम’ यासारखी खनिजे असून चीन, जपान, अमेरिका व युरोपकडून त्याचा सर्वाधिक वापर होतो. काही वर्षांपूर्वी जपानबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने या संवेदनशील खनिजांची निर्यात रोखून जपानला धक्का दिला होता. गेली दोन वर्षे अमेरिका व चीनमध्ये सुरू असणाऱ्या व्यापारयुद्धातही, चीन अमेरिकेला करण्यात येणारी खनिजांची निर्यात रोखेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. सध्या अमेरिकेला लागणार्‍या ‘रेअर अर्थ’ खनिजांपैकी ८० टक्के आयात चीनकडून करण्यात येते.

रेअर अर्थ मिनरल्सगेल्यावर्षी जून महिन्यात, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एक अहवाल संसदेला सादर केला होता. अमेरिकेला या संवेदनशील खनिजांची टंचाई भासू नये यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची गरज असून संबंधित कंपन्यांना आपत्कालिन साठा करण्याचे निर्देश द्यावे, असे, अहवालात सुचविण्यात आले होतेे. त्याचवेळी चीनव्यतिरिक्त इतर देशांचे पर्याय चाचपून पहावेत आणि मागणी पूर्ण करण्यासाठी वेगाने हालचाली कराव्यात, असे निर्देशही अहवालात देण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकेने ‘रेअर अर्थ इनिशिएटिव्ह’ची घोषणा करून त्यासाठी ऑस्ट्रेलिया व ब्राझिलसह नऊ देशांनी सहभागी होण्यास होकार दिल्याचे जाहीर केले होते. अमेरिकेच्या या प्रस्तावात रशियाचा समावेश नाही.

रेअर अर्थ मिनरल्स

या पार्श्वभूमीवर, रशियाने चीनच्या ‘रेअर अर्थ मिनरल्स’मधील वर्चस्वाला शह देण्यासाठी हालचाली सुरू करणे महत्त्वाचे ठरते. रशियन मंत्री अलेक्सी बेसप्रोझ्वेनिख यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया पुढील काळात देशातील ११ विविध प्रकल्पांमध्ये दीड अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. हा प्रस्ताव परदेशी कंपन्यांसाठी खुला असल्याचे संकेतही रशियन मंत्र्यांनी दिले. नव्या गुंतवणुकीच्या माध्यमातून येत्या दशकभरात रशियाचा ‘रेअर अर्थ मिनरल्स’ उत्पादनातील जागतिक हिस्सा १० टक्‍क्‍यांवर नेण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. २०२६ सालापासून रशिया या खनिजांच्या निर्यातीला सुरुवात करेल, असा दावाही रशियन उपमंत्र्यांनी केला.

रशिया व चीन हे मित्रदेश असून जागतिक पातळीवर अमेरिकेविरोधात आघाडी उघडण्यासाठी दोन्ही देशांनी पुढाकार घेतला आहे. इंधन, अंतराळ, चलन व्यवहार यासारख्या अनेक क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्य दृढ होत असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. मात्र गेल्या काही महिन्यात दोन देशांमध्ये विविध मुद्द्यांवर असलेले मतभेदही समोर येत असून रशिया चीनवर नाराज असल्याचे संकेत आंतरराष्ट्रीय विश्लेषकांकडून देण्यात येत आहेत. अशा स्थितीत, चीनचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात रशियाने स्वतंत्ररित्या वाढीव गुंतवणुकीचे संकेत देणे, लक्ष वेधून घेणारी बाब ठरते.

leave a reply