चीन-रशियाची प्रगत क्षेपणास्त्रे अमेरिकेचे उपग्रह नष्ट करू शकतात

- अमेरिकेच्या स्पेस फोर्स प्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘भू, जल आणि वायू यांच्याप्रमाणे अंतराळ हे देखील युद्धक्षेत्र बनू लागले आहे. याच क्षेत्रात वेगाने विकसित होत असलेले तंत्रज्ञान आणि चीन व रशियाकडे असलेली क्षेपणास्त्रे यामुळे अंतराळातील अमेरिकेच्या उपग्रहांना धोका निर्माण झाला आहे’, असा इशारा अमेरिकेच्या स्पेस फोर्सचे प्रमुख जनरल जॉन विल्यम रेमंड यांनी दिला. याआधीही अमेरिकेच्या लष्करी अधिकार्‍यांनी तसेच विश्‍लेषकांनी चीन व रशियापासून असलेल्या धोक्याबाबत बजावले होते.

गेल्या महिन्यात अमेरिकी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने सुरक्षाविषयक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये अंतराळातील अमेरिकेच्या उपग्रहांना असलेल्या धोक्यांबाबत सावध केले होते. ‘चीनकडे असलेली उपग्रहभेदी क्षेपणास्त्रे ही पृथ्वीच्या कक्षेतील उपग्रहांना नष्ट करू शकतात. या व्यतिरिक्त ही क्षेपणास्त्रे अंतराळातील अमेरिकेच्या उपग्रहांचे ऑप्टिकल सेंसर्स निकामी करू शकतात. यामुळे सदर उपग्रह बेकार होतील’, असे सदर अहवालात म्हटले होते.

या अहवालात मांडलेल्या मुद्यांशी आपण सहमत असल्याचे जनरल रेमंड यांनी म्हटले आहे. याशिवाय अमेरिकेचे कम्युनिकेशन उपग्रह आणि जीपीएस उपग्रह जॅम करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. चीनने याआधीच प्रक्षेपित केलेल्या ‘शिजियान १७’ या उपग्रहाचा रोबोटिक आर्म हा पृथ्वीच्या कक्षेतून भ्रमण करणार्‍या इतर छोट्या उपग्रहांना पकडू शकतो, असा इशारा जनरल रेमंड यांनी दिला. त्याचबरोबर, ‘अंतराळात कुठलाही संघर्ष छेडण्याची किंवा व्यापक करण्याची अमेरिकेची इच्छा नाही. पण जे काही घडत आहे, तो रोखण्याचे अमेरिकेचे प्रयत्न असतील’, असे जनरल रेमंड म्हणाले.

दरम्यान, चीन अंतराळात स्वत:चे स्पेस स्टेशन उभारीत आहे. या स्पेस स्टेशनचा वापर चीन लष्करी कारवाईसाठी करू शकतो व यामुळे अंतराळ स्पर्धा भडकेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक देत आहेत.

leave a reply