अफगाणी लष्कराने 24 तासात तालिबानचे 223 दहशतवादी ठार केले – काबुलमधील स्फोटात चार जणांचा बळी

दहशतवादी ठारकाबुल – अफगाणिस्तानच्या लष्कराने गेल्या चोवीस तासात केलेल्या कारवाईत 223 तालिबानी दहशतवादी ठार झाले. यामध्ये तालिबानच्या वरिष्ठ कमांडर्सचा समावेश असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. तर राजधानी काबुलमध्ये दहशतवाद्यांनी बसमध्ये घडविलेल्या बॉम्बस्फोटात चार जणांचा बळी गेला. गेल्या आठवड्याभरात काबुलमधील बसमध्ये घडविण्यात आलेला हा तिसरा बॉम्बस्फोट ठरतो.

काबुल शहराच्या छाहार काला भागात दुपारी पावणे दोनच्या सुमारास प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केला. या स्फोटात बळी गेलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तर सहा जण जखमी झाले असून यात मुलांचा समावेश असल्याची माहिती काबुल पोलिसांनी दिली. या स्फोटाची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण अशा स्फोटांची पद्धत तालिबानची असल्याचा आरोप अफगाणी यंत्रणा करीत आहेत.

दहशतवादी ठारदोन दिवसांपूर्वी राजधानी काबुलमध्ये दहशतवाद्यांनी बसमध्ये घडविलेल्या दुहेरी स्फोटात 10 जणांचा बळी गेला होता. हे दोन्ही स्फोट अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांक हजारा समुदायाच्या वस्त्यांमध्ये घडविण्यात आले होते. याआधी तालिबानने हजारा समुदायाला लक्ष्य करणारे हल्ले चढविले होते. गेल्या महिन्यात काबुलमधील हजारा समुदायाच्या मुलींच्या शाळेजवळ तालिबानने घडविलेल्या स्फोटात 80 हून अधिक जणांचा बळी गेला होता. त्यामुळे या हल्ल्यांमागेही तालिबान असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातो.

गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांक, मुली-महिला, शिक्षक, सरकारी अधिकार्‍यांवरील वाढले आहेत. अफगाणिस्तानातील हिंसाचाराचा हा कल म्हणजे तालिबान पुन्हा एकदा प्रबळ होऊ लागल्याचा दावा स्थानिक करीत आहेत. तालिबानच्या नेतृत्वाने उघडपणे यातील काही हल्ल्यांची जबाबदारी धुडकावली आहे. तरीही या हल्ल्यांमागे तालिबानच असल्याचा आरोप तीव्र होऊ लागला आहे.

दहशतवादी ठारअफगाण लष्कराने तालिबानविरोधातील कारवाई सुरू ठेवली आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात 14 प्रांतांमध्ये केलेल्या कारवाईत तालिबानचे 223 दहशतवादी ठार केले. यामध्ये जावझान प्रांतातील कारी मुबिन या तालिबानच्या वरिष्ठ कमांडरचा समावेश आहे. याशिवाय अफगाणी लष्कराच्या कारवाईत तालिबानचे 126 जण जखमी झाले. नानंगरहार, कंदहार, हेल्मंड, गझनी, बघलान या प्रांतांमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वेक्षण पथकाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात, तालिबान आणि अल कायदा यांच्यातील संबंध अजूनही कायम असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने तालिबानबरोबर वाटाघाटी सुरू होऊन वर्ष लोटला आहे. तरी देखील तालिबानने अल कायदाबरोबरचे सहकार्य मोडलेले नाही, अशी नोंद संयुक्त राष्ट्रसंघाच्या पथकाने आपल्या अहवालात केली. त्याचबरोबर 2020च्या तुलनेत 2021 सालातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

leave a reply