अफगाणी लष्कराच्या कारवाईत ९० तालिबानी ठार

तेहरान – अफगाणिस्तानच्या लष्कराने गेल्या ४८ तासात केलेल्या कारवाईत ९० तालिबानी दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये तालिबानच्या कमांडर्सचा समावेश असल्याची माहिती अफगाणी संरक्षण मंत्रालयाने दिली. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी तालिबानला शांतीचर्चेचा नवा प्रस्ताव देणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण अमेरिका व नाटो लष्कराच्या पूर्ण माघारीशिवाय चर्चा अशक्य असल्याचे तालिबानने ठणकावले आहे. मात्र अमेरिका व नाटोचे सैन्य अफगाणिस्तानातून माघार घ्यायला तयार नाही. त्यामुळे अफगाणिस्तानात नवा घनघोर संघर्ष पेट घेणार असल्याचे स्पष्ट झाले असून अफगाणी लष्कराने तालिबानवर सुरू केलेली कारवाई हेच दाखवून देत आहे.

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कंदहार, बघलान, लाघमन, फरयाब आणि बडाखशान या प्रांतांमध्ये तालिबानविरोधात मोठी कारवाई केली. अफगाणी लष्कराने केलेल्या कारवाईत कंदहार व बडाखशान प्रांतात प्रत्येकी १८ तर फरयाब प्रांतात ३५ तालिबानींचा खातमा करण्यात आला. तर बघलानमध्ये नऊ व लाघमनमध्ये सहा तालिबानी दहशतवाद्यांना ठार केले. याशिवाय तखार प्रांतात झालेल्या रविवारच्या कारवाईत पाच तालिबानी ठार झाल्याची माहिती अफगाणी लष्कराने दिली.

गेल्या ४८ तासांमध्ये पार पडलेल्या या कारवाईत तालिबानी दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १३ भुसूरुंगांचा समावेश असल्याचे अफगाणी लष्कराने म्हटले आहे. अफगाणी लष्कराने गेल्या आठवड्याभरात केलेली ही मोठी कारवाई मानली जाते. अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणार्‍या तालिबानी दहशतवाद्यांवरील कारवाई सुरू राहणार असल्याचे अफगाणिस्तानच्या सरकारने स्पष्ट केले होते. पण त्याचबरोबर देशाच्या स्थैर्यासाठी तालिबानशी वाटाघाटी देखील सुरू ठेवणार असल्याची घोषणा अफगाण सरकारने केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर, या महिन्यात तुर्कीमध्ये होणार्‍या बैठकीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी तालिबानला शांतीचर्चेचा नवा प्रस्ताव देण्याची तयारी केली आहे. यामध्ये राजकीय वाटाघाटीद्वारे अफगाणिस्तानात संघर्षबंदी प्रस्थापित करणे, नव्याने घेण्यात येणार्‍या राष्ट्राध्यक्षीय निवडणूक प्रक्रियेत तालिबानने सामील होणे आणि अफगाणिस्तानच्या विकासासाठी प्रयत्न करणे, या मुद्यांचा सदर प्रस्तावात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, अमेरिका व नाटो लष्कराने अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घ्यावी, अशी मागणी तालिबानने केली होती. १ मेच्या आधी पाश्‍चिमात्य लष्कराने अफगाणिस्तान सोडले नाही तर भीषण परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, अशी धमकी तालिबानने आधीच दिली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तालिबानच्या या मागणीकडे दुर्लक्ष करून सहा महिन्यांनंतर अमेरिकेची सैन्यमाघार सुरू होऊ शकते, असे सुचविले आहे. यावर तालिबानने संताप व्यक्त केला आहे.

अशा परिस्थितीत, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ने तालिबानच्या नेत्यांना पेशावरमध्ये बोलावून अफगाणिस्तानवर युद्ध लादण्याची तयारी केल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी केला. त्याचबरोबर पाकिस्तानला हवेच असेल तर अफगाणिस्तान देखील युद्धासाठी सज्ज आहे, असा सज्जड इशारा अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे.

leave a reply