अफगाणी लष्कराने ‘जैश’ चा तळ उडवून दिला

अफगाणी लष्कराने ‘जैश’ चा तळ उडवून दिला

काबूल – अफगाणिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नांगरहार या प्रांतातील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा तळ उध्दवस्त केला. अफगाणिस्तानच्या स्थानिक वृत्तसंस्थेने याबाबतची बातमी प्रसिध्द केली. काही दिवसांपूर्वीच तालिबानच्या तळावर ‘जैश’चे दहशतवादी भारतात घातपात माजविण्यासाठी दहशतवादी कारवाईचे प्रशिक्षण घेत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अफगाणी लष्कराने नांगरहार प्रांतातील जैशच्या या तळावर केलेली कारवाई भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ठरते.

गेल्या १३ वर्षांपासून अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नांगरहार प्रांतातील घोरकी भागात जैशचा तळ सक्रीय होता. ‘जैश’ ही पाकिस्तानची दहशतवादी संघटना असून पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ कडूनच जैशला सर्वोतोपरी सहाय्य पुरविले जाते. त्यामुळे अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या ड्युरंड लाईन या सीमेवर असलेल्या जैशच्या या तळामागे पाकिस्तान असल्याची बाब वेळोवेळी स्पष्ट झाली होती. या तळावर मोठ्या प्रमाणात जैशचे दहशतवादी व शस्त्रसाठा असल्याचे अफगाणी लष्कराने केलेल्या कारवाईनंतर स्पष्ट झाले. या तळावरुन अफगाणी लष्कराने फार मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. तसेच जैशच्या एका पाकिस्तानी सदस्याला देखील अफगाणी लष्कराने ताब्यात घेतले आहे.

अमेरिका आणि तालिबान मध्ये झालेल्या शांतीकरारानंतर अफगाणिस्तानातील तालिबानचा वर्चस्व वाढल्याचे दिसू लागले होते. याने हरखून गेलेल्या पाकिस्तानने भारतविरोधी कारवायांसाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर सुरू केला होता. म्हणूनच पाकिस्तानच्या आयएसआयने आपला प्रभाव असलेल्या तालिबानच्या गटांकडून ‘जैश मोहम्मद’, ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनांच्या नव्या सदस्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले होते. मात्र अफगाणी लष्कराने तालिबानच्या तळांवर हल्ले पळवून हे भारतविरोधी कारस्थान उधळून लावल्याचे दिसत आहे.

leave a reply