पाच लाख अफगाणी निर्वासित युरोपमध्ये धडकण्याच्या तयारीत

- ब्रिटनच्या गृहमंत्र्यांची चिंता

अफगाणी निर्वासितलंडन – तालिबानच्या राजवटीमुळे अफगाणिस्तानातून पळ काढलेले पाच लाखांहून अधिक अफगाणी निर्वासित युरोपिय देशांच्या दिशेने पुढे चालले आहेत. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी अफगाणी निर्वासितांच्या या लोंढ्यावर चिंता व्यक्त केली असून त्यांना रोखण्यासाठी ‘फाईव्ह आईज्’ देशांच्या नेत्यांशी चर्चा केली. हे लोंढे वेळीच रोखले नाही तर येत्या काळात ब्रिटनला समस्यांना सामोरे जावे लागेल, असे ब्रिटनच्या सरकारमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतर भयभीत झालेल्या लाखो अफगाणींनी हा देश सोडला होता. यापैकी २२ लाख निर्वासित अफगाणिस्तानच्या शेजारी असलेल्या पाकिस्तान आणि इराणमध्ये असल्याचा दावा केला जातो. तर लाखो निर्वासित मध्य आशिया, आखाती देशांमार्गे युरोपिय देशांसाठी निघाले होते.

अफगाणिस्तानातून बाहेर पडलेले सुमारे पाच लाख निर्वासित येत्या काही महिन्यांमध्ये युरोपमध्ये धडकतील, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने गेल्या वर्षीच दिला होता. निर्वासितांचे हे लोंढे आता युरोपिय देशांच्या जवळ येऊन पोहोचल्याचा इशारा ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. यानंतर गेल्या आठवड्यात ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी तातडीने ‘फाईव्ह आईज्’ देशांच्या मंत्र्यांशी बैठक घेतली.

अफगाणी निर्वासितब्रिटनसह अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या पाच देशांच्या गुप्तचर यंत्रणांचा समावेश असलेल्या या संघटनेसमोर पटेल यांनी हे लोंढे रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याबाबत चर्चा केली. पूर्व युरोपातील बेलारूस हा देश या अफगाणी निर्वासितांचा शस्त्रासारखा वापर करीत असल्याची चिंता ब्रिटनला सतावित आहे. बेलारूस या निर्वासितांना पोलंड आणि लिथुआनिया या देशांची सीमा ओलांडून युरोपमध्ये घुसखोरीसाठी उद्युक्त करीत असल्याचा आरोप केला जातो.

युरोपमध्ये दाखल झालेले निर्वासित मोठ्या संख्येने ब्रिटनमध्ये दाखल होत असल्याची चिंता ब्रिटीश यंत्रणा व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये २८ हजारांहून अधिक निर्वासित धडकले होते. तर यावर्षी एकट्या जानेवारी महिन्यातच १,३४१ निर्वासित कॅलेसचे आखात ओलांडून ब्रिटनच्या किनारपट्टीवर पोहोचल्याचा दावा ब्रिटीश यंत्रणा करीत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून अफगाणी निर्वासितांचे हे लोंढे ब्रिटनसाठी आव्हान ठरू शकतात. वेळीच ते रोखले नाही तर ब्रिटनसमोर गंभीर समस्या निर्माण होतील, असा इशारा दिला जातो. दरम्यान, तालिबानची राजवट आल्यापासून पाश्‍चिमात्य देशांनी अफगाणिस्तानचा निधी रोखला आहे. यामुळे अफगाणींची परवड होत असून पाश्‍चिमात्य देशांनी अफगाणिस्तानचा निधी मार्गी केला नाही तर निर्वासितांचे लोंढे अमेरिका व युरोपवर सोडण्याचा इशारा तालिबानने काही महिन्यांपूर्वी दिला होता.

leave a reply