चीनकडून सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाची चोरी करण्याचा प्रयत्न

- युरोपियन कंपनीचा आरोप

सेमीकंडक्टरऍमस्टरडॅम/बीजिंग – चीनच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आपली ‘ट्रेड सिक्रेट्स’ व ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी’ चोरण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप युरोपमधील ‘एएसएमएल’ या आघाडीच्या कंपनीने केला आहे. चीनची ‘डीजेईएल’ ही कंपनी सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी आवश्यक असणार्‍या सॉफ्टवेअरची विक्री करीत असून हे सॉफ्टवेअर ‘एएसएमएल’शी संबंधित असल्याचे सांगण्यात येते. २०१९ सालीही चिनी कंपनीने ‘एएसएमएल’ची ट्रेड सिक्रेटस् चोरण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात चिनी कंपनीला ८४ कोटी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता.

नेदरलॅण्डस्ची ‘एएसएमएल’ ही सेमीकंडक्टरसाठी वापरण्यात येणार्‍या ‘ऑप्टिकल लिथोग्राफी सिस्टिम’ क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. याच कंपनीची यंत्रणा वापरून अमेरिकेची ‘इंटेल’, दक्षिण कोरियाची ‘सॅमसंग’ व तैवानची ‘टीएसएमसी’ १०एनएमपेक्षा लहान आकाराच्या चिप्स तयार करते. लष्करी यंत्रणांसह प्रगत तंत्रज्ञानावर आधारित अनेक उपकरणांमध्ये सध्या याच चिप्सचा सर्वाधिक वापर होतो. चिनी कंपन्यांही या चिप्सच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे चीनला ‘एएसएमएल’कडून प्रगत ‘ऑप्टिकल लिथोग्राफी सिस्टिम’ मिळू शकत नाही.

सेमीकंडक्टरम्हणूनच चीनकडून विविध मार्गांनी या कंपनीला लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन वर्षाच्या अवधीत चीनच्या कंपन्यांनी दोनदा ‘एएसएमएल’ची व्यापारी गुपिते तसेच बुद्धिसंपदेवर डल्ला मारण्याचे प्रयत्न केले आहेत. या कंपनीने काही दिवसांपूर्वी एक अहवाल प्रसिद्ध करून त्यात याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. इतकेच नाही तर आवश्यकता भासल्यास कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले जाईल, असा इशाराही दिला आहे.

चिनी कंपनी ‘डीजेईएल’ने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून चिनी माध्यमांनीही कंपनीच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. यापूर्वी चिनी कंपन्यांनी अनेकदा परदेशी कंपन्यांचे तंत्रज्ञान व इतर व्यापारी गुपिते चोरल्याचे उघड झाले आहे. मात्र या प्रकरणांना चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीची साथ असल्याने सदर कंपन्यांवर कारवाई झालेली नाही. मात्र सेमीकंडक्टर क्षेत्रात सध्या सुरू असलेला संघर्ष पाहता आंतरराष्ट्रीय समुदाय या मुद्यावर आक्रमक भूमिका घेऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.

तंत्रज्ञान क्षेत्रातील महासत्ता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेतून चीनने गेल्याच दशकात महत्त्वाकांक्षी ‘मेड इन चायना पॉलिसी’ची घोषणा केली होती. या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स यासारख्या क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढविण्याचे संकेत दिले होते. गुंतवणूक वाढवितानाच संवेदनशील तंत्रज्ञान असणार्‍या क्षेत्रातील परदेशी कंपन्यांचा मोठा हिस्सा मिळविणे अथवा त्या सरसकट ताब्यात घेण्याचे तंत्रही अवलंबण्यात आले होते. मात्र स्मार्टफोनपासून ते सॅटेलाईटपर्यंत प्रत्येक क्षेत्रासाठी महत्त्वाच्या ठरणार्‍या सेमीकंडक्टर क्षेत्रात या प्रयत्नांना फारसे यश मिळाले नाही. या क्षेत्रात आजही चिनी कंपन्या अमेरिका, युरोप व तैवान यासारख्या देशांवर अवलंबून आहेत. त्यामुळे चीनने आता या क्षेत्रातही परदेशी कंपन्यांच्या ‘ट्रेड सिक्रेट्स’ व ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी’ची चोरी सुरू केल्याचे ‘एएसएमएल’च्या प्रकरणातून उघड होत आहे.

leave a reply