अफगाण माघार पूर्णपणे यशस्वी म्हणता येणार नाही

- बायडेन प्रशासनातील अधिकाऱ्यांचा दावा

माघारवॉशिंग्टन/काबुल – अफगाणिस्तानातील अमेरिकेची 20 वर्षांची मोहीम पूर्ण झाली असून सैन्यमाघार देखील योग्यच असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केला. पण अफगाणिस्तानातील सर्व अमेरिकन नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आपण अपयशी ठरलो, अशी प्रतिक्रिया बायडेन प्रशासनातील दोन अधिकाऱ्यांनी दिली. ब्रिटनच्या प्रसिद्ध दैनिकाने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने बातमी प्रसिद्ध केली. दरम्यान, नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात बायडेन प्रशासन अपयशी ठरल्याची टीका अमेरिकी व अफगाणी जनतेमध्ये जोर पकडत आहे.

काही दिवसांपूर्वी पेंटॅगॉनने माध्यमांशी बोलताना, अफगाणिस्तानात अजूनही अमेरिकेचे शंभरहून अधिक नागरिक अडकल्याची माहिती दिली होती. ‘आयएस’च्या हल्ल्याचा धोका असल्याचे सांगून अमेरिकी नागरिकांना अफगाणिस्तानातून काढणे अवघड असल्याचे पेंटॅगॉनने म्हटले होते. पण मंगळवारी माध्यमांसमोर येऊन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अफगाणिस्तानातील माघार यशस्वी ठरल्याचे जाहीर केले. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी देखील बायडेन यांच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले.

पण बायडेन प्रशासनातील काही अधिकारी अफगाण माघार पूर्णपणे यशस्वी नव्हती, असे सांगत आहेत. अजूनही 100 हून अधिक अमेरिकन नागरिक अफगाणिस्तानात अडकले असून ही अतिशय भयावह बाब ठरते. असे असताना अफगाणिस्तानातील माघार पूर्णपणे यशस्वी ठरली, असे म्हणता येणार नाही, असे बायडेन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर ब्रिटिश दैनिकाला सांगितले.

यामध्ये 32 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत असून अमेरिकन जनता बायडेन प्रशासनावर संताप व्यक्त करीत आहे. तर काबुलमधील आत्मघाती स्फोटात बळी गेलेल्या 13 अमेरिकी जवानांच्या परिवाराने बायडेन यांच्याशी हस्तांदोलन टाळल्याच्या बातम्याही येत आहेत.

दरम्यान, तालिबानच्या तावडीतून सुटका करण्याचे आश्‍वासन देऊन आम्हाला इथेच सोडणाऱ्या अमेरिकेने आमचा घात केल्याची टीका अफगाणी जनता करीत आहे.

leave a reply