हिजबुल्लाहच्या धमकीनंतर इस्रायलची लेबेनॉन सीमेजवळ मोठी सैन्यतैनाती

जेरूसलेम – शत्रूच्या कुठल्याही हल्ल्यापासून इस्रायलच्या सुरक्षेसाठी आपले जवान सज्ज असल्याची घोषणा इस्रायलने केली. या घोषणेबरोबरच्या इस्रायलने लेबेनॉनजवळच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणात सैन्यतैनाती केली आहे. त्याचबरोबर येत्या काळात लेबेनॉनमधून आपल्या सीमाभागात हल्ला झालाच तर त्यासाठी लेबेनीज सरकार पूर्णपणे जबाबदार असेल, असे इस्रायली लष्कराने बजावले. दोन दिवसांपूर्वी हिजबुल्लाहने दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने ही सैन्यतैनाती वाढविली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे लष्करप्रमुख जनरल मार्क मिली यांनी इस्रायलला भेट दिली आहे.

Hezbollah-Israelगेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि लेबेनॉनच्या सीमेजवळील तणाव वाढत चालला आहे. चार दिवसांपूर्वी सिरियातील इराणच्या लष्करी तळावर झालेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा वरिष्ठ कमांडर ठार झाला होता. या हल्ल्यासाठी इस्रायल जबाबदार असल्याचा ठपका ठेवून हिजबुल्लाहने इस्रायलला गंभीर परिणामांची धमकी दिली होती. इस्रायली लष्कराची ठिकाणे आपल्या निशाण्यावर असतील, असे हिजबुल्लाहने धमकावले होते. तर गेल्या आठवड्यातच हिजबुल्लाहने गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेशी चर्चा करुन सर्व कट्टरपंथी संघटनांना इस्रायलविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या व्यतिरिक्त हिजबुल्लाहने गेल्या काही आठवड्यांपासून इस्रायलच्या सीमेजवळ आपले दहशतवादी गोळा करुन घुसखोरीची तयारी केल्याचा आरोप इस्रायल करीत आहे.

हिजबुल्लाहच्या या धमकीच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने लेबेनॉनच्या सीमेजवळ मोठी तैनाती केली आहे. इस्रायली लष्कराने या तैनातीची माहिती प्रसिद्ध केली. तसेच इस्रायली लष्कराने हिजबुल्लाहच्या कुठल्याही आगळिकीसाठी लेबेनीज सरकारला दोषी धरले जाईल, असेही बजावले आहे. लेबेनॉनच्या सीमेजवळ इस्रायली लष्कराची ही तैनाती वाढत असताना, सिरियातूनही इस्रायलच्या सीमाभागात गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. इस्रायली लष्कराने देखील चोख प्रत्युत्तर दिल्याचे जाहीर केले आहे.

Hezbollah-Israelया सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे लष्करप्रमुख जनरल मार्क मिली यांनी इस्रायलला भेट देऊन संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांची भेट घेतली. तसेच इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशीही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. हिजबुल्लाहबरोबरचा तणाव आणि इराणचा अणुकार्यक्रम यावर अमेरिकी लष्करप्रमुखांनी इस्रायली नेत्यांशी चर्चा केली. दरम्यान, कासेम सुलेमानी यांच्यानंतर अमेरिका हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाला ठार करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप इराणच्या नेत्याने केला आहे.

leave a reply