अफगाणिस्तानात ‘आयएस खोरासन’च्या कमांडरला अटक

काबूल – आयएस खोरासन या खतरनाक दहशतवादी संघटनेचा अफगाणिस्तानातील कमांडर मुनीब मोहम्मदला अफगाणी सुरक्षा यंत्रणेने अटक केली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये शीखधर्मियाच्या गुरुद्वारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयएस खोरासनने घेतली होती. त्यानंतर अफगाणी सुरक्षा यंत्रणेनी या दहशतवादी संघटनेच्या विरोधात आक्रमक मोहीम हाती घेतली होती.

बुधवारी अफगाणी सुरक्षा यंत्रणानी मुनीब मोहम्मदला अटक केली. तो मूळचा पाकिस्तानचा नागरिक आहे. आयएस खोरासनमध्ये तो सामील होण्याआधी तो अल-कायदाचा सदस्य होता. तसेच त्याचे ‘लश्कर- ए- तोयबा’, ‘हक्कानी नेटवर्क’, ‘सिपाह -ए- सहाबा’, ‘जमेत-उल-उलेमा-ए-इस्लाम’, ‘पेशावर शुरा’ या दहशतवादी संघटनासोबत संबंध होते. त्याचवेळी तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आय एसआय’च्या संपर्कात होता. मुनीब आयएस खोरासन व इतर दहशतवादी संघटनेशी सल्लामसलत करुन घातपात घडवायचा, ही बाब प्राथमिक चौकशीत उघड झाली आहे. आणखी नवनवीन माहिती समोर येईल, असे अफगाणी सुरक्षा यंत्रणेने सांगितले.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये शीखधर्मियाच्या गुरुद्वारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जण ठार झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी आयएस खोरासनने घेतली होती. त्यानंतर अफगाणी सुरक्षा यंत्रणेने आयएस खोरासनचा प्रमुख अस्लम फारुखीला अटक केली होती. त्याचा या हल्ल्याशी संबंध होता. त्यानंतर पाकिस्तानने त्याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. अफगाणिस्तानने ही मागणी धुडकावून लावली. अफगाणिस्तानातल्या निरपराधांचा बळी घेणाऱ्याला आम्ही सोडणार नाही, असे अफगाणिस्तानने पाकिस्तानला खडसावून सांगितले होते. पाकिस्तानाच्या मुनीबला अटक झाल्यामुळे त्याला ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तान करणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र पाकिस्तानने मागणी केली तरी अस्लमप्रमाणे मुनीबला पाकिस्तानच्या ताब्यात देण्यास अफगाणी यंत्रणा नकार देतील, असे दिसत आहे.

leave a reply