‘फेडरल रिझर्व्ह’च्या दरवाढीनंतर अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसण्याची शक्यता वाढली

-अर्थतज्ज्ञ व विश्लेषकांचा दावा

Federal-Reserveवॉशिंग्टन – फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेल्या ऐतिहासिक दरवाढीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची शक्यता अधिकच वाढली आहे. अमेरिकी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणात, 70 टक्के अर्थतज्ज्ञांनी येत्या 12 ते 18 महिन्यात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मंदीचा दणका बसेल, असे भाकित वर्तविले आहे. याव्यतिरिक्त ‘मॉर्गन स्टॅन्ले’, ‘वेल्स फार्गो’ यासारख्या आघाडीच्या वित्तसंस्था तसेचे ‘ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्स’नेही नजिकच्या काळात मंदीचा फटका बसेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अर्थव्यवस्थेला मंदीचा धोका नसल्याचे वक्तव्य केले आहे.

बुधवारी अमेरिकेच्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी 0.75 टक्क्यांची ऐतिहासिक दरवाढ जाहीर केली होती. अमेरिकेत भडकलेली महागाई कमी करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे पॉवेल यांनी म्हटले होते. मात्र महागाईवर नियंत्रण मिळविताना अमेरिकी अर्थव्यवस्थेलाही धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत. फेडच्या दरवाढीनंतर अमेरिकेतील शेअरबाजार दणकून आपटले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसह उद्योगक्षेत्रात चिंतेचे वातावरण असून मंदीची भीती वाढू लागली आहे.

Economic-Downturnअमेरिकेतील आघाडीच्या माध्यमांनी यासंदर्भात केलेले सर्वेक्षणही प्रसिद्ध झाले असून त्यात 70 टक्के अर्थतज्ज्ञांनी पुढील सहा महिन्यांमध्ये किंवा 2023 सालच्या अखेरपर्यंत अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसण्याचे भाकित केले आहे. व्याजदरवाढीमुळे अमेरिकेच्या गृहक्षेत्राला मोठा फटका बसणार असून इतर उत्पादनांची मागणीही घटेल, असा दावा विश्लेषक तसेच तज्ज्ञांनी केला आहे. यापूर्वी 2008-09 साली आलेल्या मंदीसाठी गृहबांधणी क्षेत्रातील संकटच कारणीभूत ठरले होते, याकडेही विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे.

अमेरिकी वित्तसंस्था तसेच ‘ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्स’सारखे गटही सातत्याने मंदीची शक्यता वाढल्याची जाणीव करून देत आहेत. मात्र अर्थतज्ज्ञ, विश्लेषक, वित्तसंस्था मंदीकडे लक्ष वेधत असताना राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मात्र वेगळाच सूर लावला आहे. गुरुवारी दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी, अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची शक्यता नसल्याचे वक्तव्य केले आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय तसेच आर्थिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र बायडेन यांनी यापूर्वीही महत्त्वाच्या मुद्यांवर वास्तवाची जाणीव नसणारी वक्तव्ये केली होती, याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले.

leave a reply