केंद्र सरकारने अग्नीपथ योजनेअंतर्गत भरतीची वयोमर्यादा वाढविली

-लष्कर आणि वायुसेनेत लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात

नवी दिल्ली – लष्करात भरतीसाठी आणण्यात आलेल्या ‘अग्नीपथ’ या चार वर्षाच्या अल्पकालीन सेवा योजनेविरोधात काही राज्यांमध्ये हिंसक अंदोलने सुरू आहेत. मात्र या सर्वांमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी यावर्षी भरतीसाठी असलेली कमाल वयोमर्यादा वाढवून 21 वरून 23 करण्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे या योजनेच्या प्रथम वर्षात आणखी हजारो तरुणांना लष्करात भरतीचे स्वप्न पुर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचवेळी अग्नीपथ योजनेअंतर्गत दोन दिवसात अधिसूचना जारी करण्याची मोठी घोषणा लष्कराने केली आहे. याशिवाय वायुसेनेनेही 24 जून पासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केली.

Agneepath-Armyचार दिवसांपूर्वी लष्करात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही संरक्षणदलप्रमुखांच्या उपस्थितीत अग्नीपथ योजनेची घोषणा केली होती. यासाठी किमान 17.5 ते कमाल 21 वर्ष ही वयोमर्यादा जाहीर करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून संरक्षणदलांमध्ये भरती झालेली नाही. यामुळे सैन्यात भरतीसाठी तयारी करणाऱ्या हजारो तरुणांचे दोन वर्षात भरती न झाल्याने स्वप्न भंगले होते. त्यामध्ये अग्नीपथ योजनेअंतर्गत वयोमर्यादा 21 वर्षच असल्याने यापेक्षा जास्त वय झालेल्या तरुणांना आपल्या स्वप्नांवर कायमचे पाणी फेरावे लागण्याची शक्यता होती. याबद्दल अनेकांनी नाराजीही व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर सरकारने या योजनेअंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी दिलेली कमाल वयोमर्यादा केवळ पहिल्या वर्षासाठी 21 वरून 23 केली आहे. कोरोना काळात भरती थांबल्याने संधी हुकलेल्या तरुणांसाठी हे बदल करण्यात आले आहे.

वयोमर्यादेतील या बदलानंतर राजनाथ सिंग यांनी पुन्हा एकदा अग्नीपथ योजना म्हणजे संरक्षणदलांत दाखल होण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी असल्याचे म्हटले आहे. वयोमर्यादेत एका वर्षासाठी आणलेल्या या शिथिलतेमुळे आणखी कितीतरी तरुणांना अग्नीवीर होण्याची संधी उपलब्ध झाल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले. या निर्णयाचे केंद्रीय गृहमंत्र्यांनीही स्वागत केले आहे. याचा लाभ कितीतरी तरुणांना मिळेल, असा विश्वास गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

तसेच लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही वायोमर्यादा वाढविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि लष्करात भरती प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल, असे स्पष्ट केले. लष्कराच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने आलेल्या वृत्तानुसार येत्या दोन दिवसात लष्कराकडून भरती सुरू करण्याच्या तारखेसंदर्भात घोषणा होऊ शकते. वायुसेनेने आधीच अग्नीपथ योजनेअंतर्गत अग्नीवीर बनण्यासाठी याच महिन्यात भरती सुरू करण्याचे जाहीर केले आहे. 24 जूनपासून वायुसेनेत भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. नौदलाकडूनही लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अग्नीपथ योजनेविरोधात काही राज्यात निदर्शने होत आहे. काही ठिकाणी याला हिंसक स्वरुप आले. बिहारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे व वाहनांना आगी लावण्याच्या घटना झाल्या. अग्नीपथ योजना तरुणांनी समजून घेतलेली नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे पुढील काळात देशात शिस्तबद्ध व प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल व त्यांना इतर नोकरीची संधीही उपलब्ध होईल, असा दावा तज्ज्ञ करीत आहेत. अग्नीपथ योजनेबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नांना व गैरसमजुतींना अधिकाऱ्यांकडून माध्यमांमार्फत उत्तरे दिली जात आहेत.

leave a reply