जर्मनी बोस्नियामध्ये पुन्हा सैन्याची तैनाती करणार

बर्लिन – युक्रेनच्या युद्धामुळे बाल्कन देशांमध्ये अस्थैर्य निर्माण होईल, अशी शक्यता युरोपिय देश वर्तवित आहेत. या पार्श्वभूमीवर बाल्कन देशांमधील सुव्यवस्थेसाठी जर्मनीने बोस्नियामध्ये नव्याने सैन्य तैनात करण्याचे जाहीर केल. युरोपिय महासंघाच्या शांतीमोहिमेअंतर्गत ही तैनाती करण्यात येईल. यामुळे दहा वर्षानंतर पुन्हा एकदा जर्मनीचे जवान बोस्नियामध्ये तैनात होणार आहेत.

germany-bosnia-euforगेल्या शतकातील अखेरच्या दशकात युरोपातील ‘रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हिया’चे विघटन झाले होते. या विघटनानंतर पेटलेल्या संघर्षामध्ये सुमारे एक लाख जणांचा बळी गेला. या संघर्षातून सात देशांची निर्मिती झाली होती. त्यात क्रोएशिया, स्लोवेनिया, सर्बिया, नॉर्थ मॅसिडॉनिआ, बोस्निया ॲण्ड हर्झेगोविना, माँटेनेग्रो व कोसोवो यांचा समावेश आहे. भौगोलिकदृष्ट्या युरोपच्या आग्नेयकडील बाल्कन पर्वतराजीच्या परिसरात मोडणाऱ्या या देशांना बाल्कन देश म्हणून ओळखले जाते.

यापैकी बोस्निया किंवा बोस्निया ॲण्ड हर्झेगोविना देशात गेल्या कित्येक वर्षांपासून तणाव आहे. 1990च्या दशकात स्वातंत्र्य मिळाल्यापासून बोस्नियामध्ये सातत्याने वांशिक हिंसाचार सुरू होता. ‘बोस्नियन’, ‘सर्बियन’ व ‘क्रोएट्स’ यांच्यात सातत्याने खटके उडत असल्याचे समोर आले होते. काही महिन्यांपूर्वी बोस्नियामध्ये ‘रिपब्लिका सपर्स्का’ या प्रांताला स्वतंत्र देश बनविण्याची मागणीही झाली होती.

germany-bosniaबोस्नियातील विघटनवाद्यांना बळ मिळाले तर पुन्हा या देशात युद्धाला तोंड फुटू शकते, असा इशारा युरोपातील विश्लेषकांनी याआधी दिला होता. वांशिक हिंसाचाराने ग्रासलेल्या या देशात सुव्यवस्था ठेवण्यासाठी सुरुवातीला नाटोने सैन्य तैनात केले होते. तर 2004 साली युरोपिय महासंघाने बोस्नियामध्ये शांतीमोहिम राबविली होती. यामध्ये जर्मनीच्या लष्कराचाही समावेश होता. पण 2012 साली जर्मनीने बोस्नियातील आपल्या जवानांना माघारी घेतले होते.

पण गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या घडामोडींचा हवाला देऊन जर्मनीने बोस्नियात नव्याने आपल्या जवानांना तैनात करण्याचे जाहीर केले. युक्रेनमधील युद्धामुळे बोस्नियामध्ये अस्थैर्य निर्माण होऊ शकते, असा दावा करून जर्मनीने बोस्नियात 50 जवान रवाना करणार असल्याचे स्पष्ट केले. ही संख्या मोठी नसली, तरी या तैनातीद्वारे जर्मनीने बोस्नियातील परिस्थितीवर आपली नजर असल्याचा संदेश दिला आहे. तसेच बोस्नियातील अस्थैर्याचा परिणाम आपल्या देशावर होऊ देणार नाही, यासाठी लष्करी तैनातीची वेळ आली, तरी जर्मनी कचरणार नाही, हे याद्वारे जर्मनी दाखवून देत आहे. त्यामुळे 50 जवानांची ही तैनाती जर्मनीच्या सावधपणे आखलेल्या धोरणाचा भाग ठरतो.

बोस्नियातील ही तैनातील एका वर्षासाठी असेल, असे जर्मन सरकारने म्हटले आहे. बोस्नियातील स्थैर्य जर्मनीसाठी फार महत्त्वाचे ठरते, असा दावा जर्मनीने केला आहे.

leave a reply