‘ओपेक’समोरील अडचणी व अमेरिकेतील कडक हिवाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलर्सनजिक

तेलाचे दरलंडन/न्यूयॉर्क – ‘ओपेक’ सदस्य देशांना कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्यात येणार्‍या अडचणी व अमेरिकेतील कडक हिवाळा या पार्श्‍वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली आहे. ‘ब्रेंट क्रूड’ तसेच अमेरिकेतील ‘डब्ल्यूटीआय’ या दोन्ही प्रकारातील तेलाचे दर ९३ डॉलर्स प्रति बॅरलवर गेले आहेत. येत्या काही दिवसातच कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरेलची पातळी ओलांडतील, असे विश्‍लेषकांनी बजावले आहे.

अमेरिकेत सध्या कडाक्याचा हिवाळा असून अनेक प्रांतांना बर्फवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. देशातील तेलाचे दरविमानसेवेसह अंतर्गत वाहतूकव्यवस्था तसेच इतर वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील तेलाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसर्‍या बाजूला ‘ओपेक’ व सहकारी देशांच्या ‘ओपेक प्लस’ गटाने कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन चार लाख बॅरल इतक्याच प्रमाणात वाढविण्याची घोषणा केली आहे. जगभरातील तेलाची वाढती मागणी पाहता ही वाढ अपुरी असल्याचे विश्‍लेषकांंचे म्हणणे आहे.

या पार्श्‍वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरांमधील वाढ कायम राहिली असून शुक्रवारी ‘ब्रेंट क्रूड’ तसेच अमेरिकेतील ‘डब्ल्यूटीआय क्रूड’ या दोन्ही प्रकारातील तेलाचे व्यवहार प्रति बॅरल ९३ डॉलर्सहून अधिक किंमतीसह पार पडले. सोमवारी व्यवहार सुरु होताना तेलाचे दर पुन्हा वाढण्याचे संकेत विश्‍लेषकांनी दिले आहेत. २०२२ सालच्या पहिल्याच महिन्यात कच्च्या तेलाचे दर तेलाचे दर२० टक्क्यांनी वाढले आहेत. हाच कल कायम राहिल्यास येत्या आठवड्याभरात १०० डॉलर्सची पातळी पार होईल, असे सांगण्यात येते.

रशिया-युक्रेनमधील तणावात सातत्याने होणारी वाढ, युएईवर झालेले हौथींचे ड्रोन हल्ले, येमेनमधील संघर्षाची वाढलेली तीव्रता या गोष्टीही कच्च्या तेलाच्या दरवाढीस कारणीभूत ठरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था व इंधन कंपन्यांनी यापूर्वीच तेलाचे दर १०० डॉलर्सवर जातील, अशा स्वरुपाची भाकिते केली होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अमेरिकी वित्तसंस्था गोल्डमन सॅक्सने पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच १०५ डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत वाढ दिसून येईल, असे म्हटले होते. ‘रायस्टड एनर्जी’च्या विश्‍लेषकांनी १०० डॉलर्स प्रतिबॅरल वास्तवात उतरू शकते, याकडे लक्ष वेधले होते.

यापूर्वी २०११ ते २०१४ या कालावधीत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलर्सवर पोहोचले होते. त्यानंतर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घसरण सुरू झाली होती. २०१६ साली कच्च्या तेलाच्या दरांनी २७ डॉलर्स प्रति बॅरलची नीचांकी पातळी गाठली होती.

leave a reply