लतादिदी यांना अखेरचा निरोप

लतादिदीमुंबई – ८ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाल्यामुळे लतादिदी रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातमीने भारतीयांच्या चिंता वाढल्या होत्या. पण त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देशाने सुटकेचा नि:श्‍वास सोडला. मात्र रविवारी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी लतादिदींनी अखेरचा श्‍वास घेतल्याची बातमी समोर आली. यानंतर देशात शोकाची तीव्र लहर पसरली. भारतातच नाही, तर शेजारी देशांमधूनही तशाच भावपूर्ण प्रतिक्रिया उमटत आहेत.

रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे लतादिदीचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राजकीय तसेच कला-सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर लतादिदींच्या अंतिम दर्शनासाठी इथे उपस्थित होेते. भारतरत्न लता मंगेशकर यांना पूर्ण शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. इथे प्रत्यक्ष उपस्थित असलेले आणि माध्यमांद्वारे याचे थेट प्रक्षेपण पाहणार्‍या कित्येकजणांना आपल्या भावनांना आवर घालणे अवघड बनले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शतकातून एकदाच जन्माला येणार्‍या महान गायिकेला आपण गमावले आहे, असे सांगून लतादिदींच्या निधनावर शोक व्यक्त केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादिदींच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, असे म्हटले आहे. तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भारताने आपला आवाज गमावला आहे, असे सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या. लता मंगेशकर यांना लाभलेला संगीताचा वारसा, त्यांची पार्श्‍वभूमी, त्यांची गाणी, याची देशभरात नव्याने उजळणी केली जात आहे. ३६ भाषांमध्ये २५ हजाराहून अधिक गाणी गाणार्‍या लतादिदी आठ दशकाहून अधिक काळ गात होत्या. देश, भाषा, संस्कृती लतादिदीयांच्या पलिकडे त्यांचे संगीत पोहोचले. जगभरात त्यांचे चाहते विखुरलेले आहेत.

लता मंगेशकर केवळ भारताच्या नव्हत्या. त्यांच्यावर पाकिस्तानचाही तितकाच अधिकार असल्याचे एका पाकिस्तानी पत्रकाराने म्हटले होते. भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान वेगळा देश बनला. कालांतराने पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा झाला. पण लता मंगेशकर यांना या तिन्ही देशातून तितकाच सन्मान मिळत राहिला. बालपणापासून त्यांची गाणी आमच्या कानावर पडत राहिली. घरकाम करताना घराघरातल्या महिला लतादिदींची गाणी ऐकायच्या व गुणगुणत रहायच्या. अशा गायिकेला आम्ही लाहोर किंवा कराचीमध्ये आमंत्रित करू शकलो नाही, अशी खंत या पाकिस्तानी पत्रकाराने व्यक्त केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने लता मंगेशकर यांच्या निधनानिमित्त दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवट जाहीर केला आहे. तर महाराष्ट्र सरकारने ७ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

leave a reply