युरोपमधील भूराजकीय तणावामुळे वीजेच्या दरांचा भडका उडू शकतो

- युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुखांचा इशारा

फ्रँकफर्ट/मॉस्को – युरोपवर सध्या रशिया-युक्रेन संघर्षाचे सावट असून ही बाब वास्तवात उतरल्यास युरोपमधील वीजेच्या दरांच्या भडका उडू शकतो, असा इशारा युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुखांनी दिला. युरोपमधील वीजेचे दर वाढल्यास त्याचे युरोपच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होतील, असे सेंट्रल बँकेच्या प्रमुख ख्रिस्तिन लॅगार्ड यांनी बजावले. काही दिवसांपूर्वीच युरोपमधील नैसर्गिक इंधनवायुचा राखीव साठा ४० टक्क्यांच्या खाली घसरल्याची माहिती समोर आली होती. हा साठा इतका खाली घसरण्याची ही पहिलीच वेळ असल्याने युरोपमधील ‘एनर्जी क्रायसिस’ अधिक तीव्र होण्याचे संकेत विश्‍लेषकांनी दिले होते.

युरोपमधील भूराजकीय तणावामुळे वीजेच्या दरांचा भडका उडू शकतो - युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुखांचा इशारागेल्या वर्षापासून युरोपमधील वीजेच्या किमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबर २०२१मध्ये युरोपातील आघाडीचा देश असणार्‍या जर्मनीतील विजेचे दर प्रति मेगावॅट/अवर ३४४ युरोवर गेले होते. हा युरोपिय देशांमधील उच्चांक ठरला होता. त्यानंतरही वीजेच्या दरांमधील वाढ कायम राहिली असून जानेवारी महिन्यात युरोपिय देशांमधील वीजेच्या किंमती तब्बल २८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. या वाढत्या किंमतींवर मात करण्यासाठी युरोपिय देशांनी वीजेच्या बिलांवर अनुदान देण्याचा तसेच कर कमी करण्याचा मार्ग अवलंबिला आहे.

मात्र रशिया-युक्रेन युद्धाचे सावट अजूनही कायम असल्याने वीजेच्या दरांमध्ये अजून वाढ होण्याचे संकेत युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुखांनी दिलेल्या इशार्‍यातून मिळत आहेत. ‘युरोपवर असलेले भूराजकीय संकटाचे सावट प्रत्यक्षात उतरल्यास इंधनाच्या किंमतींवर त्याचे मोठे परिणाम होतील. युरोपमधील भूराजकीय तणावामुळे वीजेच्या दरांचा भडका उडू शकतो - युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुखांचा इशारावीजेच्या दरांसह इतर गोष्टींच्या किंमतींमध्येही वाढ होऊ शकते. संकटाचा कालावधी वाढल्यास युरोपिय देशांमधील मागणी, गुंतवणूक तसेच उत्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे’, असे लॅगार्ड यांनी बजावले.

युरोपच्या वीजनिर्मितीत नैसर्गिक इंधनवायुचा मोठा वाटा आहे. या इंधनवायुपैकी ३० टक्क्यांहून अधिक इंधनवायू रशियाकडून आयात करण्यात येतो. सध्या रशिया युरोपिय देशांना दररोज सुमारे २३ कोटी घनमीटर इंधनवायुचा पुरवठा करतो. यातील जवळपास एक तृतियांश पुरवठा युक्रेनमधून जाणार्‍या इंधनवाहिनींमधून होतो. रशिया व युक्रेनमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर हा पुरवठा विस्कळीत किंवा खंडित होण्याची भीती आहे. तसे झाल्यास युरोपमधील वीजनिर्मिती विस्कळीत होऊन वीजेच्या दरांचा भडका उडण्याची शक्यता आहे. या ‘एनजी क्रायसिस’चे थेट परिणाम युरोपच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात, असे संकेत युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख लॅगार्ड यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.

leave a reply