चीनच्या वर्चस्ववादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनने जपानबरोबरील संरक्षण सहकार्य वाढविले

- ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका जपानला भेट देणार

संरक्षण सहकार्यलंडन/टोकिओ/बीजिंग – चीनच्या वर्चस्ववादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनने जपानबरोबरील संरक्षण सहकार्य वाढविण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांच्यासह उच्चस्तरीय शिष्टमंडळ जपानच्या भेटीवर असून यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’ सप्टेंबर महिन्यात जपानला भेट देईल व यावेळी संयुक्त सराव पार पडेल, असे ब्रिटनकडून सांगण्यात आले. त्याचवेळी येत्या वर्षाच्या अखेरपासून ब्रिटन आपल्या दोन युद्धनौका कायमस्वरुपी ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात तैनात करणार असल्याचेही संरक्षणमंत्री वॉलेस यांनी जाहीर केले.

गेल्या काही वर्षात चीनच्या विस्तारवारी हालचाली वाढल्या असून साऊथ चायना सी, ईस्ट चायना सीसह संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रावरील प्रभाव वाढविण्यासाठी आक्रमक धोरण राबविण्यात येत आहे. चीनच्या या आक्रमकतेला रोखण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला असून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकारी देशांसह युरोपातील मित्रदेशांनाही अधिक सक्रिय होण्यासाठी आवाहन केले आहे. त्यानंतर फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन यासारख्या देशांनी इंडो-पॅसिफिकमधील आपल्या हालचाली वाढविण्याचे संकेत दिले आहेत. या देशांनी त्यासाठी स्वतंत्र धोरणही जाहीर केले असून ‘फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन’चा मुद्दा पुढे करून संरक्षण तैनातीचे संकेत दिले आहेत.

त्याचाच भाग म्हणून सध्या ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’ इंडो-पॅसिफिक क्षेत्रात दाखल झाली आहे. पुढील महिन्यात ही विमानवाहू युद्धनौका आपल्या टास्कफोर्ससह साऊथ चायना सीमधून प्रवास करणार आहे. चीनने कितीही धमकावले तरी त्याकडे दुर्लक्ष करून ब्रिटीश विमानवाहू युद्धनौका ही मोहीम पार पाडेल, अशी ग्वाही संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी दिली. ‘आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातून प्रवास करणार्‍या जहाजांवर चीन लक्ष ठेवते व त्यांचा पाठलागही करते, हे काही आता लपून राहिलेले नाही. आम्ही चीनचा आदर करतो आणि चीनही आमचा आदर करेल, अशी अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर राखून ब्रिटीश नौदल आपली मोहीम राबवेल’, असे संरक्षणमंत्री वॉलेस यांनी स्पष्ट केले.

संरक्षण सहकार्यसाऊथ चायना सीमधील मोहिमेपाठोपाठ ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’ जपानलाही भेट देईल, असे ब्रिटीश संरक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. ‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’ व टास्कफोर्स जपानच्या पाच बंदरांना भेट देणार आहे. सप्टेंबर महिन्यातील या भेटीदरम्यान ब्रिटन व जपानच्या नौदलादरम्यान संयुक्त सरावही पार पडेल, असे वॉलेस यांनी सांगितले. यावेळी वॉलेस यांनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा व संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांची भेट घेतली. जपानबरोबरील सागरी तसेच संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक भक्कम करण्यात येत असल्याची घोषणाही ब्रिटीश संरक्षणमंत्र्यांनी केली.

जपानबरोबरील संरक्षण सहकार्य वाढवितानाच या वर्षाच्या अखेरपासून ब्रिटन दोन युद्धनौका कायमस्वरुपी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात तैनात करेल, असे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी सांगितले. ही तैनाती ब्रिटनच्या आक्रमक ‘इंडो-पॅसिफिक’ धोरणाचा भाग असल्याचे मानले जाते. ब्रिटनव्यतिरिक्त फ्रान्स तसेच जर्मनीनेही या क्षेत्रात युद्धनौकांच्या तैनातीची घोषणा केली आहे. गेल्याच महिन्यात, जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनीही, युरोपिय देशांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील संरक्षणतैनातीवर अधिक भर द्यावा, असे आवाहन केले होते.

 

leave a reply