अग्नीपथ योजनेचे देशभरात मोठ्या उत्साहाने स्वागत

नवी दिल्ली – आत्ताच्या काळातील युद्धासाठी तंत्रज्ञानाची जाण असलेल्या युवावर्गाची आवश्यकता आहे. अग्नीपथ योजनेमुळे भारतीय संरक्षणदलांना अल्प मुदतीसाठी का होईना, असा युवावर्ग उपलब्ध होईल, असे वरिष्ठ लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल ए. अरुण यांनी म्हटले आहे.

मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षणदलात दरवर्षी 46 हजार अग्नीवीरांची भरती करणाऱ्या अग्नीपथ योजनेची घोषणा केली. त्यावर बोलताना लेफ्टनंट जनरल अरुण यांनी सदर योजनेचे स्वागत केले. तर देशासाठी काहीतरी करून दाखविण्याची प्रखर इच्छा असलेल्या युवावर्गाला या योजनेमुळे मोठी संधी मिळेल, असे सांगून एअर मार्शल बी. चंद्र शेखर यांनी याचे स्वागत केले आहे.

अग्नीवीरांच्या सहभागामुळे सेनादलाची मोहीम फत्ते करण्याची क्षमता अधिकच वाढेल. ताज्या दमाच्या तरुणांमधील सळसळत्या उत्साहामुळे जोखीम पत्करण्याची वृत्ती वाढेल आणि त्याचा लाभ सेनादलांना मिळेल, असा विश्वास लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी व्यक्त केला. भरती होणाऱ्यांपैकी 25 टक्के अग्नीवीरांना सेनादलात कायमस्वरुपी सेवा करण्याची संधी दिली जाईल. तर उरलेले 75 टक्के अग्नीवीर निवृत्त होतील, अशी माहिती लेफ्टनंट जनरल पुरी यांनी दिली.

दरम्यान, चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होणाऱ्या अग्नीवीरांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या भरतीसाठी प्राधान्य दिले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे. तर मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि आसामच्या सरकारनेही अग्नीवीरांना आपल्या सरकारच्या सेवेत प्राधान्य मिळेल, अशी घोषणा केली.

पहिल्या वर्षात लष्कर सुमारे 40 हजार अग्नीवीरांची भरती करणार आहे. तर नौदलाने पहिल्या वर्षात तीन हजार तर वायुसेनेने साडेतीन हजार अग्नीवीरांची भरती करण्याची घोषणा केली. पुढच्या काळात नौदलासाठी लागणाऱ्या अग्नीवीरांच्या संख्येत वाढ होईल, असे नौदलाने म्हटले आहे. अग्नीवीरांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा कालावधी कमी असला तरी प्रशिक्षणाच्या आघाडीवर कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अग्नीपथ योजनेमुळे आमचे देशसेवेचे स्वप्न साकार होईल. यातून आम्हाला किती पैसे कमवता येतील, यापेक्षाही देशसेवेसाठी मिळणारी संधी सर्वात महत्त्वाची ठरते, अशा शब्दात तरुण माध्यमांकडे मोठ्या उत्साहात आपली प्रतिक्रिया नोंदवित आहेत.

leave a reply