युद्ध संपविण्यासाठी युरोप व युक्रेनला रशियाशी चर्चा करावीच लागेल

- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

किव्ह/पॅरिस – युद्ध संपविण्यासाठी युरोप व युक्रेनला नजिकच्या काळात रशियाशी चर्चा करावीच लागेल, असा सल्ला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिला. युक्रेनला रशियाविरोधातील युद्धात लष्करी यश मिळाले नाही तरी कुठल्यातरी एका तरी टप्प्यावर हा संघर्ष थांबेल व त्यावेळी चर्चा करावीच लागेल, असेही राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन पुढे म्हणाले. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष सध्या पूर्व युरोपच्या दौऱ्यावर असून त्यानंतर गुरुवारी ते युक्रेनला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान मॅक्रॉन यांच्याबरोबर जर्मनीचे चॅन्सेलर तसेच इटलीचे पंतप्रधानही उपस्थित असतील. गेल्या काही दिवसांपासून पाश्चिमात्य देश शांतीकरारासाठी युक्रेनवर दडपण टाकत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर मॅक्रॉन यांचे वक्तव्य आणि आघाडीच्या युरोपियन नेत्यांचा युक्रेन दौरा लक्ष वेधून घेत आहेत.

रशियाकडून डोन्बास क्षेत्रासाठी सुरू असलेली मोहीम युद्धाचे व युक्रेनचे भवितव्य निश्चित करणारी असेल, असे सांगण्यात येते. गेल्या महिन्याभरात रशियाने या आघाडीवर जबरदस्त यश मिळवले असून मोक्याची शहरे व जागा ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. डोन्बाससाठी निर्णायक संघर्ष सुरू असतानाच रशियाने उत्तर, मध्य तसेच दक्षिण युक्रेनमध्येही हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. पाश्चिमात्य देशांनी दिलेले शस्त्रसाठे, त्यांचे तळ, तैनात केलेल्या यंत्रणा तसेच परदेशी जवानांची आश्रयस्थाने सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहेत. यात काही परदेशी जवान ठार झाल्याच्या तसेच अनेक परदेशी जवानांना युद्धबंदी म्हणून ताब्यात घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे.

त्याचवेळी डोन्बासमधील हल्ल्यांच्या माध्यमातून युक्रेनी लष्कराला मोठे धक्के देण्यात रशियन संरक्षणदलांना यश मिळत आहेत. बुधवारी रशियन संरक्षणदलाने दिलेल्या माहितीत, 24 तासांमध्ये युक्रेनचे 300 जवानांचा बळी गेल्याचे सांगितले. युक्रेनी लष्कराच्या अनेक तळांवर हल्ले चढवून ते उद्ध्वस्त केल्याचा दावाही रशियन संरक्षणदलांच्या प्रवक्त्यांनी केला. डोन्बासमधील धक्क्यांव्यतिरिक्त उत्तरेकडील खार्किव्ह, मध्य युक्रेनमधील लिव्ह तसेच दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्हमध्येही क्षेपणास्त्रे तसेच हवाईहल्ले चढविल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.

रशियाला मिळणाऱ्या या सामरिक यशामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. रशियाची आगेकूच रोखण्यासाठी या देशांनी दोन पातळ्यांवर प्रयत्न सुरू केल्याचे दिसते. एकीकडे अमेरिका व नाटो युक्रेनला प्रगत शस्त्रास्त्रे तसेच यंत्रणा पुरविण्याचे आश्वासन देत आहे. तर दुसऱ्या बाजूला युक्रेनला शांतीकरारासाठी तयार करण्यासाठी दडपण आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या काही दिवसात अमेरिकेसह नाटो तसेच युरोपिय देशांच्या नेत्यांकडून आलेली विधाने त्याला दुजोरा देणारी ठरतात. दरम्यान, युक्रेनच्या उपसंरक्षणमंत्री यांनी युक्रेनने मागितलेल्या शस्त्रांपैकी फक्त 10 टक्के शस्त्रेच आतापर्यंत पुरविण्यात आल्याचा दावा केला.

leave a reply