ब्रह्मोसच्या सुपरसॉनिक क्रूझ आवृत्तीची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली – भारताने ब्रह्मोसची नवी आवृत्ती असलेल्या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली. ओडिशाच्या बालासोर येथे सकाळी १०.३० वाजता पार पडलेली ही चाचणी यशस्वी ठरली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी यासाठी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.

ब्रह्मोसच्या सुपरसॉनिक क्रूझ आवृत्तीची यशस्वी चाचणीभारताची डीआरडीओसह रशियाची एनपीओएम या चाचणीत सहभागी झाल्याची माहिती दिली जाते. ओडिशाच्या चांदिपूर येथील ‘इंटिग्रेटेड टेस्ट रेंज-आयटीआर’ येथून हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले होते. चाचणीतील सार्‍या कसोट्या व निकष या क्षेपणास्त्राने पूर्ण केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

ही चाचणी ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या प्रकल्पामधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी यासाठी डीआरडीओच्या टीमचे अभिनंदन केले. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून ब्रह्मोसच्या चाचण्या वाढविल्या जात असल्याचे समोर येत आहे. याआधी ११ जानेवारी रोजी आयएनएस विशाखापट्टणम् या विनाशिकेवरून ब्रह्मोसच्या नौदल आवृत्तीची चाचणी पार पडली होती.

उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचा नवा प्रकल्प उभा राहत आहे. याची पायाभरणी करताना, संरक्षणमंत्र्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी ब्रह्मोसचे महत्त्व अधोरेखित केले होते. या प्रकल्पात दरवर्षी सुमारे १०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जाईल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो.

लडाखच्या एलएसीवरील संघर्षानंतर भारत व चीनमधील तणाव वाढत चालला आहे. भारतावर दडपण टाकण्यासाठी चीनने या क्षेत्रात क्षेपणास्त्रे तैनात केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तर भारतानेही या क्षेत्रात ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची तैनाती करून चीनला जशास तसे उत्तर दिले होते. या पार्श्‍वभूमीवर, ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचा वेग भारताने वाढविला आहे. चीन किंवा पाकिस्तानबरोबर संंघर्ष पेटलाच तर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. ब्रह्मोसच्या निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करताना, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ही बाब अधोरेखित केली होती.

leave a reply