पाच वर्षात भारताला जागतिक वाहननिर्मितीचे केंद्र बनविण्याचे लक्ष्य

- केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली – पुढील पाच वर्षात भारताला जागतिक वाहन निर्मितीचे केंद्र बनविण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून केंद्र सरकार त्यावर काम करीत असल्याचे रस्ते वाहतूक आणि लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगमंत्री (एमएसएमई) नितीन गडकरी यांनी जाहीर केले. यासाठी वाहन उद्योगांना प्रोत्साहीत करणारे धोरण आधीच तयार करण्यात आल्याचे गडकरी म्हणाले.

वाहननिर्मितीचे केंद्र

भारतीय उद्योजकांची संघटना असलेल्या ‘फिक्की’ने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल ‘इलेक्ट्रिक मोबाईल कॉन्फरन्स -२०२०’मध्ये केंद्रीयमंत्री गडकरी बोलत होते. ‘भारतामध्ये जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) बाजार बनण्याची क्षमता आहे. त्यामुळे या क्षेत्रात भविष्य उज्वल आहे. सरकार यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देत आहे. ई-व्हेईकल्सचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे गडकरी म्हणाले.

वाहननिर्मितीचे केंद्र

‘ई-व्हेईकल्स’च्या किंमती कमी कशा होतील, याकडे उद्योगांनी लक्ष पुरवावे. ‘ई-वाहनां’च्या किंमती कमी झाल्यास विक्री वाढले, असा विश्वास व्यक्त करताना गडकरी यांनी विक्री वाढेल तसा उद्योगालाही फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र उद्योगांनी वाहनांची गुणवत्ताही कायम ठेवावी, ही बाब गडकरी यांनी अधोरेखित केली.

भारतात जास्तीत जास्त वाहनांचे उत्पादन सुरु झाल्यास वाहन उद्योगांच्या वाढत्या बाजारपेठेपर्यंत पोहोचता येईल. यामुळे रोजगारही वाढतील आणि निर्यातीची संधीही मिळू शकते, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

“ई-मोबिलिटी’ हे भविष्य असून यामुळे पर्यावरणाचे नुकसानही कमी होईल. सध्या इंधन तेलाची आयात आणि वायू प्रदूषण हे भारतासाठी चिंतेचा विषय आहे. ई-मोबिलिटी’मुळे या चिंता दूर होतील असे सांगताना ‘फिक्की’ आणि इतर संबंधितांनी भारतात ‘ई-वाहन’ क्षेत्राच्या विकासाठी संघटित प्रयत्न करावेत, असे आवाहन गडकरी यांनी केले.

leave a reply