अंंदमान-निकोबारजवळील तटरक्षक दलाच्या कारवाईत म्यानमारच्या १२ नागरिकांना अटक

नवी दिल्ली – शनिवारी तटरक्षकदलाने अंदमान- निकोबार बेटाजवळ एका संशयित बोटीला पाठलाग करीत ताब्यात घेतले. या बोटीवर म्यानमारचे १२ मच्छिमार होते. हे सर्वजण भारतीय सागरी हद्दीत अवैधरित्या मासेमारी करीत होते. त्यांना पोर्ट ब्लेअरच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

तटरक्षकशनिवारी संध्याकाळच्या सुमारास तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर सागरी गस्त घालत होते. त्यांना अंदमान निकोबारच्या रुटलँड बेटाजवळ काही संशयास्पद हालचाली जाणविल्या. हाय फ्रिक्वेन्सी रेडिओच्या माध्यमातून त्यांनी बोटीवरच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तातडीने तटरक्षकदलाला संदेश गेल्यानंतर सागरी टेहळणी विमान आणि तटरक्षक दलाच्या ‘राजकीरण’ या जहाजाने या बोटीचा माग काढायला सुरुवात केली. भारतीय सागरी सीमेत अंदमान निकोबार बेटाजवळ ही बोट ताब्यात घेण्यात आली.

या बोटीवरील १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे बारा जण म्यानमारचे नागरिक असून त्यांच्याकडून ६० किलो ‘सी कुकंबर’जप्त करण्यात आल्याचे तटरक्षक दलाने म्हटले. तसेच हे प्रकरण रोहिंग्यांच्या अवैध घुसखोरीचे असल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणात सखोल चौकशी सुरु आहे.

leave a reply