मानवाधिकार परिषदेतील पाकिस्तानची उपस्थिती असह्य करणारी

- युएनच्या अधिकृत संघटनेकडून पाकिस्तानचे वाभाडे

जीनिव्हा – पाकिस्तानातील मानवाधिकारांचा इतिहास पाहता, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेतील पाकिस्तानची उपस्थिती असह्य करणारी आहे, अशी जळजळीत टीका राष्ट्रसंघाच्या कामगिरीवर देखरेख ठेवणार्‍या मान्यताप्राप्त संघटनेने केली. त्याचबरोबर, मानवाधिकार परिषदेतून पाकिस्तानची उमेदवारी का नाकारली जावी, यामागील कारणांची यादीच या संघटनेने दिली. यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी इतरांना धडे देणार्‍या खुद्द पाकिस्तानात अल्पसंख्याकांना मिळणारी भेदभावाची वागणूक, वांशिक हिंसाचार आणि बळजबरीचे धर्मांतर यांचा दाखला सदर संघटनेने दिला.

गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने फ्रान्समध्ये शिक्षकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे समर्थन केले होते. पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या या चिथावणीखोर विधानाला पाकिस्तानातील कट्टरपंथियांकडून जोरदार समर्थन मिळाले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामगिरीवर देखरेख ठेवणार्‍या ‘युएन वॉच’ या जीनिव्हास्थित संघटनेने पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेल्या या विधानावर जोरदार टीका करुन पाकिस्तान करीत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा पाढाच वाचून दाखविला. यासाठी दहा दिवसांपूर्वी मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानच्या सदस्यत्वाविरोधात सादर केलेल्या पत्रातील ठळक मुद्दे या संघटनेने उपस्थित केले.

मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत पाकिस्तानचा इतिहास अतिशय भयंकर आहे. तरीही मानवाधिकार परिषदेतील पाकिस्तानची फेरनिवड आत्यंतिक वाईट घटना असल्याचे वाभाडे या संघटनेने काढले. पाकिस्तानात कट्टरपंथी संघटना आपल्या धार्मिक अधिकारांच्या आडून अल्पसंख्यांकांवर हल्ले चढवून त्यांची हत्या घडवित असल्याचा ठपका या संघटनेने ठेवला. यासाठी ‘युएन वॉच’ने आसिया बिबी या ख्रिस्ती महिलेवर झालेल्या अत्याचाराचे उदाहरण दिले. आसिया बिबीच्या समर्थनार्थ उभ्या राहिलेल्या पाकिस्तानातील दोन राजकीय नेत्यांची हत्या घडविण्यात आली, असे सांगून पाकिस्तानात अल्पसंख्यांकाना मिळणारी अन्यायकारक वागणूक व कट्टरपंथियांचे वर्चस्व यावर ‘युएन वॉच’ने कोरडे ओढले.

त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत इतरांना धडे देणार्‍या पाकिस्तानात पत्रकारांचे होणारे अपहरण व त्यांची हत्या ही भीषण बाब असल्याची आठवण या संघटनेने करुन दिली. पत्रकारांसाठी धोकादायक ठरणार्‍या देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश केला जातो, याकडे ‘युएन वॉच’ने लक्ष वेधले. बालविवाह, मुलांचे अपहरण व लैंगिक शोषण या गुन्ह्यांबाबतही पाकिस्तान आघाडीवर असल्याचा शेरा या संघटनेने आपल्या पत्रातून मारला. तेव्हा मानवाधिकारांची अजिबात पर्वा न करणार्‍या पाकिस्तानची परिषदेत पुन्हा वर्णी कशी लागू शकते, असा थेट सवाल या संघटनेने आपल्या पत्रातून उपस्थित केला होता. ‘युएन वॉच’ने केलेली ही टीका पाकिसानच्या भलतीच जिव्हारी लागली आहे.

‘युएन वॉच’ या संघटनेचा संयुक्त राष्ट्रसंघाशी काहीही संबंध नसल्याचा दावा पाकिस्तान करू लागला आहे. ही संघटना इस्रायलच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप करुन पाकिस्तानने आपल्या देशात अल्पसंख्यांकांवर होणार्‍या मानवाधिकारांच्या हननाचे अप्रत्यक्ष समर्थनच केले आहे.

leave a reply