११४ अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी वायुसेनेची तयारी सुरू

नवी दिल्ली – वायुसेनेने ११४ अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव सरकारसमोर सादर करण्याची तयारी केली आहे. यासाठी १.३ लाख कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे बोलले जाते. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाने ८३ ‘तेजस मार्क १ए’ या देशी बनावटीच्या विमानांच्या खरेदीला मान्यता दिली होती. यासाठी सुमारे ५० हजार कोटी रुपये खर्च होणार असून लवकरच संपन्न होणार्‍या ‘एरो इंडिया’ दरम्यान हा करार पार पडेल, असे बोलले जाते. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा एकाच वेळी सामना करताना भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात पर्याप्त प्रमाणात लढाऊ विमाने असावी, यासाठी वेगाने पावले उचलण्यात येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर, हे निर्णय घेतले जात असल्याची माहिती दिली जाते.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या ८३ ‘तेजस मार्क १ए’ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली होती. यामुळे ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला अधिक बळ मिळेल, असा विश्‍वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला होता. मात्र चीन व पाकिस्तानसारख्या देशांचा एकाच वेळी सामना करीत असताना, भारतीय वायुसेनेला मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक विमानांची आवश्यकता भासू शकते. यासाठी किमान ४५ स्क्वाड्रन्स वायुसेनेच्या ताफ्यात असणे अनिवार्य असल्याचे मानले जाते. मात्र वायुसेनेच्या ताफ्यात सध्या ३२ स्वाड्रन्स इतकी विमाने असून ही संख्या पर्याप्त नसल्याचा इशारा विश्‍लेषकांकडून दिला जात आहे.

या पार्श्‍वभूमीवर, भारताने २०१६ साली फ्रान्सबरोबर ३६ रफायल विमानांच्या खरेदीचा करार केला होता. यानंतर फ्रान्सकडून आणखी ३६ विमाने खरेदी करण्याचा विचार केला जात असल्याची चर्चा आहे. मात्र वायुसेनेने आता बहुउद्देशिय श्रेणीतील ११४ अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव सरकारच्या समोर सादर करण्याची तयारी केली आहे. यासाठी सुमारे १.३ लाख कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. हे कंत्राट मिळावे, यासाठी अमेरिकन, रशियन, फ्रेंच व स्विडिश कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचीही माहिती प्रसिद्ध झाली होती.

या ११४ लढाऊ विमानांची निर्मिती ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत भारतातच केली जाईल. तसेच त्याच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण भारताला करण्याची अट ठेवली जाणार आहे. यासंदर्भात विविध कंपन्यांकडून कंत्राटे मागविण्यात आली आहे. अमेरिकेन कंपन्यांकडून एफ-१५ स्ट्राईक ईगल, एफ-१८ सुपर हॉर्नेट व एफ-२१ ही विमाने भारताला पुरविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर रशियाकडून मिग-३५ व सुखोई विमानांचा प्रस्ताव आला आहे. फ्रान्सने रफायलची आधुनिक आवृत्ती भारताला देऊ केली आहे. ११४ विमानांच्या कंत्राटासाठी रफायल विमाने सर्वात आघाडीवर असल्याचे वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. तर स्वीडन देखील आपल्या ग्रिपेन विमानांची अत्याधुनिक आवृत्ती भारताला पुरविण्यास उत्सुक आहे. ही अत्याधुनिक विमाने पुढची तीन ते चार दशके वायुसेनेच्या सेवेत राहतील.

या अत्याधुनिक विमानांच्या खरेदीबरोबरच वायुसेनेच्या ताफ्यातून निवृत्त होत असलेल्या मिग-२१ विमानांची जागा ‘तेजस मार्क १ए’ घेईल. मात्र तेजसची पुढची आवृत्ती असलेले ‘मार्क २’ देखील पुढच्या वर्षात समोर येईल आणि २०२३ साली याच्याही चाचण्या पार पडतील, अशी माहिती ‘हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड-एचएएल’ने दिली आहे. २०२५ सालापासून ‘तेजस मार्क २’ची निर्मिती सुरू होईल, असे ‘एचएल’चे प्रमुख आर. माधवन यांनी म्हटले आहे.

leave a reply