अमेरिका-रशियन युद्धनौकांच्या तैनातीने ‘ब्लॅक सी’च्या क्षेत्रातील तणाव वाढला

मॉस्को/वॉशिंग्टन – रशियन नौदलाने ‘अ‍ॅडमिरल मॅकारोव्ह’ ही अत्याधुनिक युद्धनौकेद्वारे ‘ब्लॅक सी’च्या क्षेत्रात युद्धसराव सुरू केला आहे. अमेरिकेची तिसरी युद्धनौका या सागरी क्षेत्रात दाखल झाल्यानंतर रशियन युद्धनौकेची तैनाती व सराव ‘ब्लॅक सी’मधील तणावात भर घालत आहे. दरम्यान, अमेरिकी युद्धनौकांच्या तैनातीला उत्तर देण्यासाठी रशियाने याआधीच क्रिमिआतील आपली हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली होती.

‘ब्लॅक सी’ सागरी क्षेत्र रशिया वगळता तुर्की, रोमानिया आणि बल्गेरिया या नाटो सदस्य देशांनी तसेच युक्रेन आणि जॉर्जिया अशा नाटोसमर्थक देशांनी वेढलेले आहे. आपल्या या सदस्य देशांना आश्‍वस्त करण्यासाठी काही दिवसांपूर्वी नाटोने या क्षेत्रात ‘युएसएनएस लॅरामे’ ही अमेरिकेची सहाय्यक विनाशिका तैनात केली होती. अमेरिकन विनाशिकेच्या या तैनातीवर रशियन नौदलाची बारीक नजर होती. पण गेल्या आठवड्यात २३ जानेवारी रोजी अमेरिकेची ‘युएसएस डोनाल्ड कूक’ ही आणखी एक युद्धनौका या क्षेत्रात दाखल झाली. क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेने सज्ज असलेल्या डोनाल्ड कूक युद्धनौकेच्या या तैनातीनंतर रशियाने क्रिमिआतील आपली हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली होती. रशियाने क्रिमिआयच्या किनारपट्टीजवळ मोबाईल लाँचर्स तैनात केले होते. यामुळे ब्लॅक सी’च्या क्षेत्रात तणाव निर्माण झाला होता. ज्यो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसात अमेरिकन युद्धनौकेची तैनाती झाल्याचे विश्‍लेषकांनी लक्षात आणून दिले आहे.

या तैनातीला आठवडाही उलटत नाही तोच अमेरिकेची ‘युएसएस पॉर्टर’ ही आणखी एक विनाशिका तुर्कीचे बॉस्फरसचे आखात ओलांडून ब्लॅक सीच्या मार्गे जात असल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. एजिस या प्रगत बॅलेस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणेने सज्ज असलेल्या या युद्धनौकेच्या तैनातीचे अमेरिका व नाटोने समर्थन केले. ‘नाटोचे सदस्य आणि सहकारी देशांच्या सुरक्षेसाठी व या क्षेत्राच्या स्थैर्यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे. यासाठी पॉर्टरची तैनाती महत्त्वाची ठरते’, अशी प्रतिक्रिया या युद्धनौकेचे कमांडर थॉमस रॅल्स्टन यांनी दिली. तर ब्लॅक सी क्षेत्र नाटोसाठी सामारिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे, असल्याचे नाटोने म्हटले आहे. तसेच ‘रशियाने युक्रेनपासून क्रिमिआचे अवैध आणि बेकायदेशीररित्या विभाजन केले आहे. तसेच या सागरी क्षेत्रातील रशियाच्या लष्करी हालचाली देखील वाढल्या आहेत. त्यामुळे ब्लॅक सी व आपल्या मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी नाटोच्या मित्रदेशाने या क्षेत्रातील तैनाती वाढविल्याचे नाटोने जाहीर केले. नाटोच्या या घोषणेनंतर रशियाने शुक्रवारी ‘अ‍ॅडमिरल मॅकारोव्ह’ ही युद्धनौका रवाना केली. तसेच अमेरिकी युद्धनौकेवर आपली करडी नजर असल्याचे रशियाने स्पष्ट केले.

ब्लॅक सी क्षेत्र नेहमीच अमेरिका-नाटो आणि रशियातील तणावाचे कारण ठरले आहे. याआधीही रशियाने युक्रेनच्या गस्तीनौकांचा मार्ग रोखल्यानंतर अमेरिकेने आपली विनाशिका सदर सागरी क्षेत्रात रवाना केली होती. तसेच गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या दोन बी-५२ बॉम्बर विमानांनी ब्लॅक सीच्या क्षेत्रात गस्त घातल्यानंतर रशियाने आपल्या लढाऊ विमानांना रवाना केले होते.

leave a reply