बलोचिस्तानचा स्वातंत्र्यलढा चिरडण्यासाठी पाकिस्तानी लष्कराला चीनचे कंत्राट

तुर्बत – ‘‘बलोचिस्तानमधील स्वातंत्र्याची चळवळ दडपून टाकण्यासाठी चीनने पाकिस्तानला सहा महिन्यांची मुदत दिली आहे. पुढच्या काळात बलोचींवरील कारवाईसाठी पाकिस्तानचे लष्कर इराणमध्ये घुसेल. पाकिस्तानच्या ‘सीपीईसी’विरोधात कारस्थाने आखणार्‍या इराणला धडा शिकविण्यासाठी चीनने आम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे पुरविलेले आहेत’’, अशी धक्कादायक कबुली पाकिस्तानी लष्कराच्या मेजर जनरल हुद्यावरील अधिकार्‍याने दिली आहे. बांगलादेशी वर्तमानपत्राने याबाबतची बातमी प्रसिद्ध केली. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानचे लष्कर बलोचिस्तानच्या जनतेवर करीत असलेल्या अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. इथले तरुण, मुले व महिलांनाही गायब करून पाकिस्तानच्या लष्कराने बलोचिस्तानमध्ये कमालीची दहशत माजविली आहे. यामागे पाकिस्तानच्या लष्कराबरोबरच चीनचा हात असल्याचे उघड झाले आहे. यासाठी जगभरातील बलोचींकडून चीनच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातो. आता तर पाकिस्तानी लष्कराचा मेजर जनरल आयमन बिलाल याने आपल्याला बलोचींना चिरडण्यासाठी चीनकडून पैसे पुरविले जातात, अशी धडधडीत कबुली दिली आहे.

चीनने आपल्या हितसंबंधांसाठी माझी बलोचिस्तानमध्ये पोस्टिंग घडवून आणल्याचे मेजर जनरल आयमन बिलाल याने म्हटले आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत बलोचिस्तानमध्ये सुरू असलेली स्वातंत्र्याची चळवळ चिरडून टाकण्याची जबाबदारी चीनने आपल्याला दिल्याचे आयमन बिलाल याने स्पष्ट केले. बलोचिस्तानच्या तुर्बत येथील जिरगाच्या बैठकीत आयमन बिलालने ही माहिती दिली. इतकेच नाही तर पुढच्या काळात इराणमध्ये घुसून बलोच बंडखोरांवर कारवाई करण्याची तयारी आपण केलेली असल्याचे बिलाल याने स्पष्ट केले. सध्या पाकिस्तानच्या डोक्यावर ‘एफएटीएफ’च्या कारवाईची कुर्‍हाड लटकत आहे. हा धोका टळल्यानंतर इराणमध्ये सुमारे २५ किलोमीटर आत घुसून ही कारवाई केली जाईल, असा दावा बिलाल याने केला.

इराण हा पाकिस्तानचा फार मोठा शत्रू आहे. आत्तापर्यंत इराणने मैत्रीच्या नावाखाली पाकिस्तानला दगा देऊन पाकिस्तानच्या पोटात सूरा भोसकला. इराण पाकिस्तान व चीनमधील ‘सीपीईसी’ प्रकल्पाच्या विरोधात कारस्थाने करीत आहे, अशी आरोपांची फैरच मेजर जनरल आयमन बिलाल याने झाडली.

त्याच्या या उद्गारांचे फार मोठे पडसाद पुढच्या काळात उमटू शकतात. आधीच बलोचिस्तानमध्ये पाकिस्तानचे लष्कर करीत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवरून प्रतिक्रिया येत आहेत. अशा परिस्थितीत इराणसारख्या शेजारी देशाला चिथावणी देणारी विधाने करून पाकिस्तानचे लष्करी अधिकारी आपल्या देशासमोरील आव्हानांमध्ये नवी भर टाकत असल्याचे दिसते. त्याबरोबर पाकिस्तानी लष्करातील भ्रष्टाचार यामुळे जगजाहीर झाला आहे.

आधीच्या काळात पाकिस्तानचे लष्कराला कंत्राट देऊन त्यांच्याकडून काम करून घेतले जाऊ शकते, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जात होती. पण आता तर पाकिस्तानचे लष्करी अधिकारी चीनसारख्या देशाकडून पैसे घेऊन काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अण्वस्त्रधारी पाकिस्तानचे लष्कर इतके भ्रष्ट व अव्यावसायिक आहे, ही बाब आंतरराष्ट्रीय समुदायाला चिंतेत टाकणारी ठरू शकते.

leave a reply