राजस्थानच्या पोखरणमध्ये वायुसेना आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धसराव करणार

- ‘वायुशक्ती-२०२२’मध्ये १०० हून अधिक लढाऊ विमाने सहभागी होणार

नवी दिल्ली/जैसलमेर – यावर्षीचा ‘वायुशक्ती’ हा युद्धसराव आतापर्यंतचा भारतीय वायुसेनेचा सर्वात मोठा युद्धसराव ठरणार आहे. नुकतीच जैसलमेर एअर फोर्स स्टेशनवर या युद्धसरावाच्या आयोजनाच्या पार्श्‍वभूमीवर तयारीच्या दृष्टीने एक बैठक पार पडली. वायुसेनेतर्फे दर तीन वर्षाने आयोजित केला जाणार्‍या ‘वायुशक्ती’ युद्धसरावात यावर्षी तब्बल १०० हून अधिक लढाऊ विमाने सहभागी होतील, असे वृत्त आहे. याशिवाय विविध प्रकारच्या क्षेपणास्त्राची लाईव्ह फायरिंग यावेळी होईल. राफेल विमानांवर तैनात मिका क्षेपणास्रांचाही यावेळी वापर होणार असल्याच्या बातम्या आहेत. भारतीय वायुसेनेच्या आक्रमक आणि संरक्षणात्मक अशा दोन्ही सामर्थ्याचे प्रदर्शन यावेळी करण्यात येईल.

राजस्थानच्या पोखरणमध्ये वायुसेना आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धसराव करणार - ‘वायुशक्ती-२०२२’मध्ये १०० हून अधिक लढाऊ विमाने सहभागी होणार‘वायुशक्ती-२०२२’ हा युद्धसराव १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार होता. मात्र त्याची तारीख बदलून आता ५ मार्च करण्यात आली आहे. हा भव्यसराव पाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजानथ सिंग यांच्यासह तिनही दलांचे प्रमुख उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या सीमेजवळ पार पडणारा हा युद्धसरावात भारतीय वायुसेनेचे युद्धसामर्थ्य जगाला दिसून येईल. चीन व पाकिस्तान सीमेवरील वाढलेली आव्हाने, एकाचवेळी दोन सीमांवर लढण्याच्या तयारीसाठी भारतीय संरक्षणदले सज्ज होत आहेत. गेल्या दोन तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर आधुनिक शस्त्र व साहित्यांची खरेदी भारताने केली आहे. याचअंतर्गत पाचव्या पिढीतील राफेल विमान वायुसेनेसाठी खरेदी करण्यात आली आहेत.

२०१९ साली शेवटचा ‘वायुशक्ती’ सराव पार पडला होता. हा युद्धसरावात वायुसेनेबरोबर लष्करही सहभागी झाले होते. वायुसेना आणि लष्करामध्ये झालेल्या संयुक्त युद्धसरावादरम्यान दोन्ही दलांमधील समन्वयावर भर देण्यात आला होत्या. या सरावापूर्वी दोन दिवसआधी जम्मू-काश्मीर पुलवामामध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या ताफ्यावर भीषण दहशतवादी हल्ला केला होता. यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला असताना पोखरणमध्ये पार पडलेल्या भव्य ‘वायुशक्ती’च्या सरावामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले होते.

तर यावर्षी पार पडत असलेला युद्धसराव चीन व पाकिस्तानच्या दोन्ही आघाड्यांवर वेगवान कारवाईच्या सरावाच्या दृष्टीने पार पडत आहे. २०२० सालात जून महिन्यात लडाखच्या गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. यामुळे दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव अद्यापही तसाच असून दरम्यानच्या काळात भारतीय वायुसेनेत राफेल विमानेही दाखल झाली आहेत. २०१९ सालच्या युद्धसरावात वायुसेनेच्या ताफ्यात सुखोई-३० सर्वाधिक अत्याधुनिक विमाने होती, तर यावर्षी राफेल युद्धसरावात सहभागी होणार असल्याने या युद्धसरावाचे महत्त्व वाढले आहे. भारतीय वायुसेनेच्या आक्रमक आणि संरक्षणात्मक शक्तीचे प्रदर्शन करणे हा युद्धसरावावा प्रमुख उद्देश आहे.

‘वायुशक्ती-२०२२’मध्ये १४० हून अधिक विमाने सहभागी होतील. यामध्ये १०० हून अधिक लढाऊ विमानांचा समावेश असेल. राफेल विमानांसह सुखोई-३०एमकेआय, मिग-२९, एलसीए तेजस, मिराज २०००, मिग-२१ बायसन, हॉक, जग्वार ही विमाने युद्धसरावत सहभागी होतील. याशिवाय आपाचे, चिनूक, ध्रुव हेलिकॉप्टरही युद्धसरावात सहभागी होणार असून रात्रीच्या वेळी कारवाईची क्षमताही या युद्धसरावात प्रदर्शित केली जाणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच लढाऊ विमानांच्या महिला पायलटही युद्धसरावात सहभागी होतील. दरम्यान, १९५३ सालापासून वायुशक्ती सरावाचे आयोजन केले जात आहे. दिल्ली बाहेरील तिलपत रेंज येथे हा सराव याअधी पार पडत असे. मात्र पुढे या युद्धसरावाची व्याप्ती वाढल्यावर १९८९ सालापासून हा सराव पोखरण रेंजमध्ये आयोजित केला जाऊ लागला.

leave a reply