वायुसेनेने कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहावे – संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – सीमेवर ज्या जलदगतीने तैनाती करण्यात आली, यातून शत्रूला कठोर संदेश गेला आहे. ही तैनाती शत्रूच्या मनात धडकी भरविणारी होती, अशा शब्दात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय वायुसेनेची पाठ थोपटली. मात्र त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी वायुसेनेने तत्परतेने सज्जतेची तयारी ठेवावी, असे स्पष्ट आदेश राजनाथ सिंग यांनी दिले आहेत.

संरक्षणमंत्री

वायुसेनेच्या कमांडर कॉन्फरन्सला बुधवारपासून सुरुवात झाली. वायुसेनाप्रमुख आर. के. भदोरिया यांच्या उपस्थितीत सुरु झालेल्या या कमांडर कॉन्फरन्समध्ये चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर तयारी आणि सज्जतेवर चर्चा होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या कमांडर कॉन्फरन्सच्या उद्घाटनीय भाषणात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग बोलत होते. पुलवामा हल्ल्यानंतर वायुसेनेने ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये ऑपरेशन राबविले आणि सध्याच्या सज्जतेला पाहून शत्रूला कठोर संदेश मिळाला आहे, असे राजनाथ सिंग म्हणाले.

चीनबरोबर तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु असले तरी आपल्याला सतर्क राहण्याची आवश्यकता असून वायुसेनेने कोणत्याही परिस्थीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे राजनाथ सिंग यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच वायुसेनेच्या सर्व आवश्यकता पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही सुद्धा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली.

लडाखमध्ये चीनचे सैनिक काही भागातून मागे गेले असले, तरी काही महत्वाच्या ठिकाणांवर चिनी सैनिक अजून मागे हटलेले नाहीत. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत चीनला मागे हटण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. याला एक आठवडा उलटल्यावर पॅगोंग सरोवर आणि काही भागात चीनची तैनाती कायम आहे. उलट चीन आता अतिरिक्त सैन्य तैनात करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी वायुसेनेला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या दिलेल्या आदेशाचे महत्व वाढते.

leave a reply