तैवानला भेट देऊन पलाऊच्या राष्ट्राध्यक्षांचे चीनच्या दबावतंत्राला जोरदार प्रत्युत्तर

तैपेई – पलाऊने तैवानबरोबरील संबंध तोडावेत म्हणून चीनकडून ‘कॅरट ऍण्ड स्टिक पॉलिसी’ अर्थात गाजर दाखवा बडगा उगारा, या धोरणाचा वापर करण्यात येत आहे. मात्र चीनच्या या दबावानंतरही पलाऊ तैवानबरोबरील संबंध कधीही तोडणार नाही, अशी ग्वाही पलाऊचे राष्ट्राध्यक्ष सुरंगेल व्हिप्स यांनी दिली. राष्ट्राध्यक्ष व्हिप्स पलाऊच्या शिष्टमंडळासह तैवानच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात पलाऊतील अमेरिकी राजदूत हेनेसी नायलॅण्ड यांचाही समावेश आहे. पलाऊच्या राष्ट्राध्यक्षांचा तैवान दौरा व त्यात अमेरिकी राजदूतांचा समावेश या गोष्टी चीनच्या विस्तारवादी धोरणाला बसलेली चपराक मानण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या जवळ असलेला छोटा बेटदेश अशी पलाऊची ओळख आहे. या देशाची लोकसंख्या अवघी २१ हजार ६०० इतकी आहे. म्हणूनच या छोट्या देशानेही चीनला आपल्या सार्वभौम अधिकारांशी खेळ करता येणार नाही, याची जाणीव करून दिलेली आहे. तैवानशी सहकार्य प्रस्थापित करणार्‍या देशांना चीनचा प्रखर विरोध सहन करावा लागेल, अशा धमक्या चीनकडून दिल्या जातात. गेल्या वर्षी चीनने तैवानशी सहकार्य प्रस्थापित करणार्‍या सॉलोमन आयलँड आणि किरीबाती या देशांवर दबाव टाकून आपल्या गटात वळविले होते.

असाच प्रयत्न चीनने छोटा बेटदेश असलेल्या पलाऊबाबतही केला. पण पलाऊने चीनचा दबाव धुडकावून तैवानला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याची भूमिका कायम ठेवली होती. पलाऊचे राष्ट्राध्यक्ष सुरंगेल व्हिप्स यांचा तैवान दौरा व त्यात दिलेली ग्वाही ही भूमिका कायम असल्याचे दाखवून देते. राष्ट्राध्यक्ष व्हिप्स यांनी तैवान दौर्‍यात चीनने पलाऊसारख्या छोट्या देशावर कशा रितीने दडपण आणण्याचा प्रयत्न केला याची माहिती दिली.

‘पलाऊची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे, याची जाणीव असलेल्या चीनने सुरुवातीला मोठ्या प्रमाणात आपल्या नागरिकांना पर्यटक म्हणून पलाऊमध्ये पाठविले. २०१० सालानंतर काही वर्षे पलाऊत येणार्‍या पर्यटकांपैकी जवळपास ५० टक्के पर्यटक चिनी होते. त्याचा पलाऊच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला. पण त्यानंतर चीनने पलाऊच्या पर्यटनावर बंदी घातली आणि दडपण आणण्यास सुरुवात केली’, या शब्दात राष्ट्राध्यक्ष व्हिप्स यांनी चीनचे दबावतंत्र उघड केले.

चीनच्या या ‘कॅरट ऍण्ड स्टिक पॉलिसी’चा उलट परिणाम झाल्याचे पलाऊच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले. ‘गाजर दाखवून लोकांची मते बदलली जाऊ शकतात. पण गाजर दिल्यावर एखाद्या व्यक्तीशी बोलू नये किंवा त्याला भेटू नये, अशा प्रकारे दबाव टाकला जाऊ नये. पलाऊने दुसर्‍यांशी मैत्री करु नये, हे इतरांनी सांगितलेले आम्हाला खपणार नाही’, या शब्दात राष्ट्राध्यक्ष व्हिप्स यांनी तैवानबरोबरील संबंध तोडणार नसल्याचे स्पष्ट केले.

पलाऊच्या राष्ट्राध्यक्षांच्या तैवान दौर्‍यात अमेरिकी राजदूतांचा समावेश लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. अमेरिकेचे राजदूत हेनेसी नायलॅण्ड यांनी पलाऊच्या राष्ट्राध्यक्षांसह तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांची भेट घेतली. अमेरिकेच्या राजदूतांनी अधिकृत पातळीवर तैवानला भेट देण्याची गेल्या ४२ वर्षातील पहिलीच घटना ठरली आहे. अमेरिकी राजदूतांच्या या भेटीवर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, अमेरिकेने तैवानला चुकीचे संदेश पाठवू नये असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले आहे. पलाऊचे राष्ट्राध्यक्ष तैवानमध्ये असताना चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे.

leave a reply