इस्रायल-मोरोक्को संरक्षण सहकार्यावर अल्जेरियाची धमकी

इस्रायल-मोरोक्कोगाझा/अल्जिअर्स – ‘ जो कुणी अल्जेरियावर हल्ला चढविण्याचे धाडस करील, आम्ही त्यांच्यावर हल्ले चढवू’, अशी धमकी अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष अब्द-अलमाजिद तबून यांनी दिली. गेल्या आठवड्यात इस्रायल आणि मोरोक्को या देशांमध्ये संरक्षण सहकार्य करार पार पडला. त्यावर इराण, अल्जेरिया तसेच पॅलेस्टाईनमधील फताह, हमास या गटांकडून प्रतिक्रिया उमटली आहे. अल्जेरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेली धमकी त्याचा पुढचा भाग असल्याचे दिसत आहे.

इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी गेल्या आठवड्यात अल्जेरियाचा दोन दिवसांचा दौरा केला होता. अब्राहम करारांतर्गत दोन्ही देशांनी ऐतिहासिक संरक्षण सहकार्य करार केला होता. यानुसार उभय देश संरक्षण साहित्यांची निर्मिती तसेच गोपनीय माहितीचे आदानप्रदान करणार आहेत. उभय देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेत मोरोक्कोच्या शेजारी असलेल्या अल्जेरियापासून संभवणार्‍या धोक्याचा विचार करण्यात होता.

आफ्रिकेच्या उत्तरेकडे असलेल्या अल्जेरियाचे इराणबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहेत. काही आठवड्यांपूर्वी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अल्जेरियाचा दौरा केला होता. इराणच्या पाठिंब्यामुळे अल्जेरिया मोरोक्कोच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याचे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लक्षात आणून दिले होते. यावर अल्जेरियाच्या राष्ट्राध्यक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

‘अल्जेरियाकडून मोरोक्कोला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळे मोरोक्को व इस्रायलच्या नेत्यांनी केलेले आरोप म्हणजे अल्जेरियाची बदनामी ठरते’, असे सांगून राष्ट्राध्यक्ष तबून यांनी अल्जेरियावरील हल्ल्याला तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे धमकावले. अल्जेरियन राष्ट्राध्यक्षांपाठोपाठ पॅलेस्टाईनमधील हमास आणि फताह या दोन्ही गटांनीही इस्रायल-मोरोक्को करारावर ताशेरे ओढले. ‘पॅलेस्टाईनचा ताबा घेणार्‍या इस्रायलबरोबर मोरोक्कोने राजकीय आणि लष्करी सहकार्य प्रस्थापित इस्रायल-मोरोक्कोकेले, ही अतिशय निंदनीय बाब ठरते. यामुळे क्षेत्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे. त्याचबरोबर सदर सहकार्य करार इस्रायलला पॅलेस्टिनींवर अधिक अत्याचार करण्याची परवानगी देणारा ठरतो’, अशी जळजळीत टीका गाझातील हमासचा प्रवक्ता समी अबु झुहारी याने केली. हे संकट टाळायचे असेल तर मोराक्कोने इस्रायलबरोबरच्या सहकार्यातून माघार घ्यावी, अशी मागणी झुहारी याने केली.

मोरोक्को इस्रायलबरोबरच्या अब्राहम करारात सहभागी होणारा तिसरा देश ठरला होता. यानुसार उभय देशांमध्ये राजकीय व लष्करी सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इस्रायलने मोरोक्कोबरोबर प्रस्थापित केलेल्या या सहकार्याचा अल्जेरियाला जबर हादरा बसल्याचा दावा केला जातो. कारण आत्तापर्यंत इराणच्या पाठिंब्यामुळे अल्जेरिया मोरोक्कोवर फार मोठा दबाव टाकत आला आहे. तसेच पश्‍चिम सहारावरील मोरोक्कोच्या सार्वभौमत्वाला अल्जेरिया सतत आव्हान देत होता.

मात्र अब्राहम करारात सहभागी झाल्यानंतर मोरोक्कोला इस्रायल व अमेरिकेचा पाठिंबा मिळेल. याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. लवकरच अमेरिका, इस्रायल आणि मोरोक्कोमध्ये संयुक्त लष्करी सराव होणार असल्याचे दावे केले जातात. त्यामुळे अल्जेरियाकडून यावर प्रतिक्रिया येत असल्याचे दिसते.

leave a reply