एलियन्सनी अण्वस्त्रांशी छेडछाड केल्याने तिसरे महायुद्ध भडकण्याचा धोका होता

- अमेरिकेच्या निवृत्त वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याचा दावा

वॉशिंग्टन – एलियन्स अर्थात परग्रहवासी अण्वस्त्रे प्रक्षेपित करून तिसरे महायुद्ध भडकवू शकतात, असा खळबळ उडविणारा दावा अमेरिकेच्या निवृत्त लष्करी अधिकार्‍याने केला. पाच दशकांपूर्वी एलियन्सनी अण्वस्त्रांशी छेडछाड केली होती व आपण ते पाहिल्याचा दावा या निवृत्त लष्करी अधिकार्‍याने केला. लवकरच अमेरिकेच्या हवाईदलाचे निवृत्त अधिकारी याबाबतची माहिती जगासमोर आणतील, अशी घोषणा रॉबर्ट सॅलास यांनी केला. १९ ऑक्टोबर रोजी याबाबतचे तपशील जाहीर केले जाणार आहेत.

अमेरिकेच्या हवाईदलातील माजी अधिकारी रॉबर्ट सॅलास यांनी आपल्या दाव्यांना दुजोरा देण्यासाठी १९६७ सालच्या घटनांचा उल्लेख केला. २४ मार्च १९६७ साली मॉंटाना येथील मॅमस्टॉर्म हवाईतळावरील अण्वस्त्रांच्या भूमिगत प्रक्षेपण तळावर सॅलास तैनात होते. त्यावेळी या तळावर तैनात असलेले दहाही आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सक्रीय झाल्याचा दावा सॅलास यांनी केला. काही वेळानंतर ही क्षेपणास्त्रे कार्यक्षम होऊन त्यांचे लॉंचिंग सिक्वेन्स सुरू झाले होते व ते रोखणे आपल्या नियंत्रणाबाहेर होते, असे सॅलास यांनी केला.

काऊंटडाऊन शुन्यावर येण्याआधी थांबल्यामुळे मोठा अनर्थ टळला, असे सॅलास म्हणाले. ही एकमेव घटना नसून आठ दिवस आधी म्हणजे, १६ मार्च १९६७ साली अन्य क्षेपणास्त्र तळावर देखील असाच प्रकार घडला होता, अशी माहिती सॅलास यांनी दिली. या घटनांमुळे शत्रूदेशांनी अमेरिकेवर हल्ला चढविला असता व त्यातून तिसरे महायुद्ध भडकले असते, असा दावा सॅलास यांनी केल्याची बातमी ब्रिटनमधील ‘डेलि स्टार’ या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली.

अमेरिकन हवाईदलाचे चार निवृत्त वरिष्ठ अधिकारी लवकरच अण्वस्त्रे व एलियन्स याबाबतची माहिती उघड करणार असल्याचे सॅलास यांनी म्हटले आहे. युएफओ अर्थात परग्रहवासियांचे यान आणि आत्तापर्यंत जगापासून लपविलेले तपशील हे चारही अधिकारी जाहीर करतील, असा दावा सदर वर्तमानपत्राने केला. ही सर्व माहिती जगासमोर आणण्यासाठी सॅलास यांनी अमेरिकन जनतेकडून फंडिंगचे अपिल केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती सॅलास यांनी या महिन्याच्या सुरुवातीला दिली.

येत्या १९ ऑक्टोबर रोजी वॉशिंग्टन येथील नॅशनल प्रेस क्लब येथे ठराविक माध्यमांसमोर निवृत्त लष्करी अधिकारी यासंदर्भाची माहिती उघड करतील, असे सॅलास यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या प्रेस कॉंफरन्समध्ये निवडक अतिथी तसेच अमेरिकन कॉंग्रेसच्या काही सदस्यांची उपस्थिती असेल. तसेच हा कार्यक्रम सोशल मीडियावरुन थेट प्रक्षेपित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सॅलास यांनी सांगितले.

याआधीही सॅलास यांनी एलियन्सबाबतचा दावा केला होता. अमेरिकेचे प्रशासन एलियन्सबाबतची बरीच माहिती दडवत असल्याचा आरोप केला होता. वर्षभरापूर्वी सोशल मीडियावरुन अमेरिकेच्या एरिया ५१’ येथे धडक देण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

leave a reply