म्यानमारमध्ये ‘पीपल्स डिफेन्स फोर्स’ने लष्करावर केलेल्या हल्ल्यात ३० जवानांचा बळी

नेप्यितौे – म्यानमारमध्ये जुंटा राजवट व सशस्त्र बंडखोर गटांमधील हिंसक संघर्ष अधिकच तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. सगैंग प्रांतात ‘पीपल्स डिफेन्स फोर्स’ने लष्करी पथकावर केलेल्या हल्ल्यात ३० जवानांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते. ‘रेडिओ फ्री आशिया’ या वेबसाईटने ही माहिती दिली आहे. गेल्या तीन आठवड्यात म्यानमारच्या सगैंग प्रांतात लष्करावर चढविण्यात आलेला हा चौथा मोठा हल्ला ठरला आहे. जुंटा राजवटीने मात्र जवानांचे बळी गेल्याचे दावे नाकारले आहेत.

फेब्रुवारी महिन्यात म्यानमारच्या लष्कराने बंड करून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. लष्कराच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी म्यानमारच्या जनतेने रस्त्यावर उतरून लोकशाहीवादी आंदोलनाला सुरुवात केली होती. लष्कराकडून सुरू असलेल्या क्रूर कारवाया व भीषण अत्याचारांनंतरही म्यानमारच्या जनतेने माघार घेतलेली नाही. आठ महिने उलटल्यानंतरही आंदोलनाची धग कायम असून उलट त्याची व्याप्ती वाढताना दिसत आहे. म्यानमारच्या लोकशाही राजवटीचा भाग असणारे नेते व वांशिक तसेच बंडखोर गटांनी एकत्र येऊन ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ची स्थापना केली आहे.

‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ने केलेल्या आवाहनानंतर म्यानमारमधील जुंटा राजवटीविरोधात संघर्ष करणारे अनेक गट एकत्र आले असून ‘पीपल्स डिफेन्स फोर्स’च्या रुपात सशस्त्र संघर्षाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये म्यानमारच्या विविध प्रांतांमध्ये ‘पीपल्स डिफेन्स फोर्स’ व लष्करी पथकांच्या सातत्याने चकमकी उडत असल्याची माहिती समोर येत आहे. सगैंग प्रांतात याची तीव्रता मोठी असून गेल्या महिन्याभरात अनेकदा लष्करी पथकांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली.

सोमवारी पाले भागाजवळ लष्कराचे एक पथक प्रवास करीत असताना ‘पीपल्स डिफेन्स फोर्स’ने सुरुंगाचा भीषण स्फोट घडविला. या स्फोटात लष्करी पथकाच्या कमांडरसह ३० जवानांचा बळी गेल्याची माहिती ‘पीपल्स डिफेन्स फोर्स’च्या प्रवक्त्यांनी दिली. मंगळवारी पुन्हा एकदा लष्करी पथकाला लक्ष्य करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्याचवेळी मोनिवा भागात पोलीस स्टेशनवरही हल्ला करण्यात आला असून दोन पोलिसांचा बळी गेल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या तीन आठवड्यात म्यानमारच्या सगैंगमध्ये लष्करावर करण्यात आलेला हा चौथा हल्ला ठरला आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या तीन हल्ल्यांमध्ये जवळपास १०० जवानांचा बळी गेल्याचा दावा ‘पीपल्स डिफेन्स फोर्स’ने केला आहे. पण जुंटा राजवटीने हे दावे नाकारले असून फक्त २२ सप्टेंबरच्या हल्ल्यात काही जवानांचा बळी गेल्याचे सांगितले. ‘पीपल्स डिफेन्स फोर्स’कडून करण्यात येणारे दावे जुंटा राजवटीविरोधातील सशस्त्र संघर्षाची व्याप्ती अधिक वाढत असल्याचे संकेत देत आहेत.

दरम्यान, म्यानमारच्या जुंटा राजवटीने केलेल्या कारवायांमध्ये आतापर्यंत एक हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. जुंटा राजवटीकडून आठ हजारांहून अधिक जणांना तुरुंगात टाकण्यात आल्याची माहितीही आंदोलकांच्या गटाकडून देण्यात आली आहे.

leave a reply